बिहार SIR ची अंतिम यादी जाहीर, पहिल्या ड्राफ्टमधून ६५ लाख लोकांची वगळण्यात आली नावे

बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ (SIR) अर्थात विशेष मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रिया पूर्ण केली आहे. यातच आज निवडणूक आयोगाने राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. एसआयआर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आयोगाने मंगळवारी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अंतिम मतदार यादी प्रकाशित केली. अंतिम यादीत २१ लाख नवीन मतदारांची नावे जोडण्यात आली आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, कोणताही मतदार आता https://voters.eci.gov.in/ या अधिकृत पोर्टलला भेट देऊन त्यांचे नाव आणि तपशील तपासू शकतो. एसआयआर प्रक्रियेअंतर्गत नवीन मतदारांची नावे जोडण्यात आली, मृत आणि डुप्लिकेट नोंदी काढून टाकण्यात आल्या आणि स्थलांतरित झालेल्या मतदारांचे पत्ते अद्यतनित करण्यात आले.

दरम्यान, एसआयआर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी बिहारमध्ये एकूण ७ कोटी ८९ लाख ६९ हजार ८४४ मतदार होते. एसआयआर प्रक्रिया २५ जून रोजी सुरू झाली. १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत ७ कोटी २४ लाख ५ हजार ७५६ मतदारांची नावे होती, त्यापैकी ६५.६३ लाख लोकांची नावे वगळण्यात आली. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ३,००,००० लोकांना नोटिसा बजावल्या. या कालावधीत, २१७,००० लोकांनी त्यांची नावे वगळण्यासाठी अर्ज केले, तर १६९,३०० लोकांनी त्यांची नावे जोडण्यासाठी अर्ज केले, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.