आयोग म्हणतो, लोकसभा निवडणुकीने घडवला विश्वविक्रम; सात टप्प्यांत 64 कोटी मतदारांनी बजावला हक्क

यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांत तब्बल 64 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 62.36 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे यावेळी लोकसभा निवडणुकीने विश्वविक्रम घडवल्याची माहिती निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. दरम्यान, हा विश्वविक्रम घडल्याचे सांगतानाच राजीव कुमार यांनी उभे राहून मतदारांच्या जागरुकतेचे कौतुक केले.

यावेळी देशात 64 कोटी 2 लाख मतदारांनी मतदान केले. जी-7 मधील देशांतील दीडपट अधिक तर युरोपियन युनियनमधील 27 देशांच्या तुलनेत अडीचपट अधिक हे मतदान नोंदवले गेल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले. यंदा महिला मतदारांच्या संख्येतही वाढ झाली असून यात तब्बल 31 कोटी 14 लाख महिला मतदारांचा समावेश आहे. सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करताना राजीव कुमार यांनी देशात 96.6 कोटी मतदार असल्याचे म्हटले होते. यात 49.7 कोटी पुरुष मतदार आणि 47.1 कोटी महिला मतदार आहेत. यापैकी एकूण 64 कोटी 2 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच यंदा देशात 62.36 टक्के मतदान झाले. जम्मू आणि कश्मीरमध्येही मोठय़ा प्रमाणावर मतदान झाले. गेल्या चार दशकांतील हे सर्वाधिक मतदान असल्याचेही राजीव कुमार यांनी स्पष्ट करत उभे राहून मतदारांच्या जागरुकतेचे कौतुक केले.

मतदान प्रक्रियेच्या काळात तब्बल 10 हजार कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. 2019 च्या तुलनेत ही रक्कम तीनपट अधिक आहे. या कारवाईसाठी स्थानिक गटांना सक्रिय करण्यात आले. 68 हजार मॉनिटरिंग टीम होत्या, तर दीड पोलिंग आणि सुरक्षा दल निवडणूक प्रक्रियेत कार्यरत होते, अशीही माहिती त्यांनी दिली.

लापता नव्हतो, प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून संवाद साधत होतो

मतदानाच्या काळात निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लापता जेंटलमन म्हटले गेले. प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना सातत्याने डिवचले. यावर आम्ही कधीच बाहेर गेलो नव्हतो. प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून आम्ही जनतेशी संवाद साधत होतो. मतदानाच्या काळात जवळपास 100 प्रसिद्धी पत्रके काढली असे प्रत्युत्तर राजीव कुमार यांनी दिले.  मतदानाच्या काळात निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लापता जेंटलमन म्हणत डिवचले गेले होते. या टीकेवरही त्यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून आम्ही जनतेशी संवाद साधत होतो, असे राजीव कुमार म्हणाले.