
महापालिका निवडणूक डोळय़ासमोर ठेवून सरकारने डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ एकत्र देण्याचा घाट घातला होता, पण निवडणूक आयोगाने महायुती सरकारला आज दणका दिला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारी महिन्याचा अॅडव्हान्स हप्ता देण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे.
जानेवारी 2026 या महिन्याचा 1,500 रुपयांचा आगाऊ हप्ता मकर संक्रांतीपूर्वी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याची सरकारची योजना होती. महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या 24 तास अगोदर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा आगाऊ हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा महायुती सरकारचा मनसुबा राज्य निवडणूक आयोगाने उधळून लावला आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये ‘लाडक्या बहिणींच्या’ खात्यात जमा होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. याबाबत निवडणूक आयोगाने मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून अहवाल मागवला होता. मुख्य सचिवांनी दिलेल्या अहवालात ‘लाडकी बहीण’ योजना ही संजय गांधी निराधार योजनेसारखी सातत्याने सुरू असलेली योजना असल्याचे नमूद करत, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नसल्याचे स्पष्ट केले.
डिसेंबरचे पैसे मिळणार
जानेवारी महिन्याची अशी आगाऊ रक्कम जमा करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे, मात्र ही चालू योजना असल्याने डिसेंबर 2025 या महिन्याचा हप्ता देण्यास आयोगाने परवानगी दिली आहे.




























































