टीव्हीच्या मालिकांवर निवडणूक आयोगाचा वॉच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

बदलत्या काळाबरोबर लोकसभा निवडणुकीचे प्रचारतंत्रही बदलू लागले आहे पोस्टर-बॅनर जाऊन प्रचाराची जागा सोशल मीडियाने घेतली आहे. पण सोशल मीडियापेक्षाही अतिशय जलदगतीने घराघरात पोहोचण्यासाठी टीव्ही चॅनेलवरच्या लोकप्रिय मालिकांचा आधार घेत प्रचारतंत्राचा अवलंब करण्यास सुरुवात झाल्याने निवडणूक आयोगाबरोबरच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या रडारवर टीव्ही मालिका आल्या आहेत.

निवडणूक प्रचारासाठी मागील लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडियाचा सर्वच राजकीय पक्षांनी वापर सुरू केला. अतिशय वेगाने या माध्यमातून प्रचार होत असल्याचे लक्षात आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर वाढला. सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात येताच यंदा निवडणूक आयोगाने सोशल मीडियाला आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या कक्षेत आणले, पण सोशल मीडियापेक्षा टीव्ही मालिका जलदवेगाने घराघरात पोहोचतात हे लक्षात आल्याने राजकीय पक्षांनी सध्याच्या अतिशय लोकप्रिय मालिकांमधून प्रचाराचे तंत्र अवलंबवले.

त्याची कारणमीमांसा करताना यासंदर्भात एका राजकीय पक्षाचा नेता म्हणाला की, टीव्ही मालिका दररोज सायंकाळी घराघरात पाहिल्या जातात. खासकरून ज्येष्ठ नागरिक अतिशय आवडीने टीव्ही मालिका बघतात. ही ज्येष्ठ मंडळी सोशल मीडियावर नसतात, पण टीव्ही मालिकांवर त्यांचे अतिशय बारकाईने लक्ष असते. या मालिकांमधील पात्रांचा या वर्गातील प्रेक्षकांवर जबरदस्त प्रभाव असतो. या मालिकांमधील अभिनेते अभिनेत्रींच्या संवादावर या वर्गातील प्रेक्षकांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे सध्या टीव्हीवरच्या सर्वात लोकप्रिय मालिकांचा आधार घेत प्रचारतंत्र अवलंबवले असल्यामुळे निवडणूक आयोगाने मालिकांवर लक्ष केंद्रित केले आहे.

राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मालिकांमधील संवादांचे रेकॉर्डिंग पाठवतात
यासंदर्भात निवडणूक आयोगातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या आम्ही टीव्ही जाहिराती, प्रचारसभा व सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहोत. दोन-तीन टीव्ही मालिकांना नोटिसा पाठवल्या आहेत. टीव्ही मालिकांवरील संवादांवर राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या मालिकांमधील काही संवाद निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे असल्यास राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मालिकांमधील संवादांचे रेकॉर्डिंग करून पाठवतात.