निवडणूक आयुक्त मतदार गायब करणारे जादूगार; तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांचा टोला, भाजप खासदारांची तुलना सापांशी

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे ‘व्हॅनिश कुमार’ असल्याचे म्हणत जोरदार टोला लगावला, तर भाजप खासदारांची तुलना त्यांनी सापांशी केली.

अभिषेक बॅनर्जी हे आज पश्चिम बंगालमधील अलिपूरद्वारमध्ये आयोजित सभेत बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये एसआयआरदरम्यान मोठय़ा संख्येने मतदारांचे नाव मतदार याद्यांमधून चुकीच्या पद्धतीने हटविण्यात येत असल्याचा आरोप अभिषेक यांनी केला. ज्ञानेश कुमार यांना टोला लगावताना ते म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांना तुम्ही ओळखता का? ते जादूगर आहेत. जिवंत लोकांना मतदार याद्यांमधून गायब करतात आणि मृत लोकांना जिवंत दाखवतात. त्यामुळे आता त्यांचे नाव व्हॅनिश कुमार आहे. मध्य प्रदेशात विषारी पाणी प्यायल्यामुळे अनेकांचे मृत्यू झाले. जे सरकार स्वच्छ पाणी देऊ शकत नाही, ते तुमच्या डोक्यावर छत देईल का, असा सवाल अभिषेक यांनी केला.

पश्चिम बंगालमधील जनकल्याणकारी योजना, विशेषतः महिलांसाठी चालवल्या जाणाऱया ‘लक्ष्मी भंडार’ योजनेला भाजप कमकुवत करू इच्छिते. आता भाजपला उत्तर दिले नाही, तर भविष्यात लोकांच्या मतदानाच्या अधिकारावरही हल्ला होऊ शकतो, असे अभिषेक म्हणाले.

अभिषेक बॅनर्जी ‘आबर जितबे बांग्ला’ अभियानांतर्गत 19 दिवसांमध्ये 26 सभा घेत आहेत. पश्चिम बंगालमध्ये या वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या आक्रमक प्रचाराचा हा भाग मानला जात आहे.

सापांना पाळू नका, भाजपवर जोरदार टीका

भाजपवर जोरदार टीका करताना अभिषेक म्हणाले की, भाजप खासदार आणि साप एकसारखे आहेत. तुम्ही साप पाळले तरीही तो सापच आहे. दूध पाजा किंवा केळी खाऊ घाला, साप एक दिवस चावणारच. अलिपूरद्वारमधून भाजप खासदार सलग दोन वेळा निवडून आले आहेत. मात्र, आता साप पाळू नका, असे अभिषेक म्हणाले.