
मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माहितीमध्ये मतदान केंद्र, मतदार क्रमांक यांचा समावेश आहे.
अनेक मतदारांना आपले मतदार ओळख क्रमांक, मतदान केंद्राचे नाव, मतदार यादीतील क्रमांकाची माहिती नसते. ही अडचण दूर करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी ऑनलाइन मतदार माहिती मिळविण्याची https://electoralsearch.in या वेबसाइटवर दिली आहे.
आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे. यामध्ये राज्य, विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदाराचे संपूर्ण नाव, वडिलांचे/पतीचे नाव, लिंग, मतदार ओळख क्रमांक, मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदाता क्रमांक, मतदाराचे भाग क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता आदी माहिती छापलेली आहे.



























































