
राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. देशभरातील विविध राज्यांतील जागांसाठी मतदान होणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर ६ मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी ९ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील.
महाराष्ट्रातील ७ जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्जांमुळे राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातून शरद पवार, रामदास आठवले, फौजिया खान, रजनी पाटील, प्रियांका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे राज्यात या सात जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रासह ओदिशा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्येही राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहे.

























































