आयपीएलची तारीख ठरेना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील अव्वल ट्वेण्टी-20 स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मात्र पुढल्या वर्षी ही स्पर्धा कोणत्या महिन्यात खेळवायची आणि ती कुठे खेळवायची याबाबत साशंकता कायम आहे. हिंदुस्थानात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आयपीएलची तारीख अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसल्यामुळे आयपीएलच्या तारखाही निश्चित करण्यात आलेल्या नाहीत.

आयपीएलचा दुसरा मोसम (2009) दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला. निवडणुकीमुळेच ही स्पर्धा हिंदुस्थानऐवजी दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली. या स्पर्धेदरम्यान मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले. आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलवर संकट कोसळले आहे. लोकसभा निवडणूक एप्रिल- मे या कालावधीत झाल्यास फेब्रुवारी ते मार्च या काळात आयपीएल होऊ शकते.

शाळा-कॉलेजांच्या परीक्षा ठरणार अडथळा
आयपीएल फेब्रुवारी-मार्च या कालावधीत झाल्यास शाळा – कॉलेजमधील परीक्षांचा अडथळा यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे टीव्हीवर किंवा थेट स्टेडियममध्ये येऊन पाहणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट होऊ शकते. फ्रेंचायझींसह या स्पर्धेशी निगडित असलेल्यांना हे परवडणारे ठरणार नाही. त्यांची आर्थिक गणितं बिघडतील. त्यामुळे लवकर आयपीएल घेण्यात येईल असे वाटत नाही.

गरज पडल्यास परदेशात…
हिंदुस्थानात आयपीएल घेणे शक्य झाले नाही तर परदेशात या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आयोजकांनी कंबर कसली आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड हे देश पर्याय असू शकतात. अबुधाबी येथेही या स्पर्धेच्या लढती खेळवण्यात येऊ शकतात. पण स्टेडियम्सची कमतरता आणि फिक्सिंगचे सावट या कारणांमुळे तेथे आयपीएलचा थाट रंगवला जाईल असे वाटत नाही.