महावितरणचे वीज वितरण फ्रेंचायझी धोरण फसले

377

महावितरणचे वीज वितरण फ्रेंचायझी धोरण पुरते फसले आहे. ग्राहकांना दिली जाणारी सुमार सेवा आणि महावितरणचे कोटय़वधी रुपये थकवल्याने संभाजीनगर आणि जळगावमधील फ्रेंचायझी रद्द केल्यानंतर आता नागपूर शहरातील एसएनडीएल या कंपनीची फ्रेंचायझीही महावितरणने रद्द केली आहे.

मागील आठ वर्षांत एसएनडीएलमुळे नागपूरमधील वीज गळती 35 टक्क्यांवरून 14 टक्क्यांपर्यंत खाली आली खरी, पण त्यांच्याकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेचा दर्जा घसरला आहे. या पार्श्वभूमीवर  नागपूरमध्ये वीज वितरणाचे काम पाहण्यास असमर्थ असल्याचे पत्र एसएनडीएलने नुकतेच महावितरणला दिले होते. त्यानुसार महावितरणने आज 9 सप्टेंबरपासून वीज वितरण यंत्रणा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एसएनडीएलने वसूल केलेली वीज बिले वेळेत महावितरणला न दिल्याने त्यांच्याकडे 225 कोटी रुपये थकीत आहेत. त्याचबरोबर संभाजीनगर येथील जीटीएल या कंपनीकडे सुमारे शंभर कोटी रुपये थकीत असून त्याच्या वसुलीसाठी महावितरणने न्यायालयात धाव घेतली आहे.

कळवा-मुंब्रा-शिळ आणि मालेगाव येथेही वीज वितरणासाठी फ्रेंचायझी देण्यात येणार आहे. वीज ग्रहकांचा फ्रेंचायझीला विरोध असतानाही कळवा-मुंब्रा-शिळ येथे टोरंटो या कंपनीची नियुक्ती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या