
मुंबईकरांची पॉवर आता वाढणार आहे. मुंबईतील वीज ग्राहकांची विजेची मागणी वर्षानुवर्षे वाढत आहे. ती पूर्ण करण्यासाठी राज्यभरातून वाढीव वीज आणावी लागणार आहे. त्यासाठी विक्रोळी येथे 400 किलोवॅट (केव्ही) क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारावे लागणार आहे. त्यासाठी महापारेषण ट्रान्समिशन ऍथॉरिटीच्या निर्देशानुसार लवकरच निविदा मागणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात 40 लाखांहून अधिक वीज ग्राहक आहेत. त्यांची कमाल विजेची मागणी साडेतीन हजार मेगावॅट एवढी आहे. मुंबई परिसरातील वीज केंद्रातून सुमारे 21 मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे, तर महापारेषणच्या वीज वाहिन्यांच्या मदतीने दीड हजार मेगावॅट एवढी वीज आणली जाते. त्यामुळे सध्याची विजेची कमाल मागणी पूर्ण होत असली तरी भविष्यात मागणी वाढल्यास तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामुळे मुंबईत अतिरिक्त वीज आणता यावी म्हणून विक्रोळी येथे 400 केव्हीचे वीज उपकेंद्र उभारण्याचे 2015 पासून प्रस्तावित आहे. त्याचे काम टाटा पॉवरला दिले होते. मात्र वेळोवेळी मुदतवाढ देऊनही उपकेंद्र उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्याने वीज नियामक आयोग आणि केंद्रीय वीज अपिलीय प्राधिकरणाने टाटा पॉवरकडून हे काम काढून घेण्याचे नुकतेच निर्देश दिले आहेत. तसेच उपकेंद्र उभारण्यासाठी खुल्या निविदा उभारण्याचे निर्देश महापारेषणला दिले होते. त्यानुसार महापारेषण ट्रान्समिशन ऍथॉरिटीच्या निर्देशानुसार खुल्या निविदा मागवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईला होणारा सध्याचा वीजपुरवठा
मुंबईची सध्याची कमाल विजेची मागणी सुमारे साडेतीन हजार मेगावॅट एवढी आहे. ती पूर्ण करण्यासाठी सध्या टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे येथील वीज केंद्रातून सुमारे 1200 मेगावॅट, खोपोली येथील जलविद्युत केंद्रातून 400 मेगावॅट वीज घेतली जाते, अदानीच्या डहाणू येथील औष्णिक वीज केंद्रातून 500 मेगावॅट वीज घेतली जात असून महापारेषणच्या वीज वाहिन्यांच्या माध्यमातून 1500 मेगावॅट वीज आणली जाते.




























































