
सामना प्रतिनिधी, न्हावाशेवा
महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे आवरे, गोवठणे, कडापे, पाले गावातील विद्युत पुरवठा गेली दोन-चार दिवस वारंवार खंडित होत असल्याने येथील हजारो रहिवाशांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये महावितरण विभागाच्या गलथान कारभारा बद्दल संतापाची भावना निर्माण झाली आहे.
मागील ३० वर्षांपासून महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवरे, गोवठणे, कडापे, पाले गावात होणार्या विद्युत पुरवठ्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा न केल्याने या परिसरात खंडित होणाऱ्या विजेच्या प्रमाण दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा फटका हा येथील व्यवसायिकांना, रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यात दोन-चार दिवसांपासून रात्री-अपरात्री वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटनेत वाढ झाल्याने या गावातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सध्या सामना करावा लागत आहे. तसेच खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे डासांचा त्रास सहन करत रात्र अंधारात जागून काढावी लागत आहे.
एकंदरीत वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये महावितरण विभागाच्या विरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे. तरी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊ घातलेल्या सणासुदीच्या दिवशी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.




























































