आजरा तालुक्यात हत्तीकडून भातपिकाचे नुकसान; ग्रामस्थांमध्ये दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजरा तालुक्यातील सोहाळे परिसरात शनिवारी मसोली (ता. आजरा) परिसरातून आलेल्या एका हत्तीने रात्रीच्या सुमारास भात पिकासह ऊस पिकाचेही नुकसान केले आहे. कापणीला आलेल्या भात व ऊस पिकांची हत्तीने शेतातच तुडवून मळणी केल्याचे दिसून येत आहे. हत्तीच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तसेच परिसरात हत्तीची दहशत असून ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ऐन मळणी हंगामात आलेल्या हत्तीचा बंदोबस्त वनविभागाने तातडीने करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

आजरा तालुक्याच्या पश्चिम भागातील जंगलात हत्ती दबा धरून असतात. ते जंगलातून गाव परिसरात उतरतात. नुकसान करतात आणि निघून जातात, असे 15 वर्षांपासून होत आहे. या भागात हत्तीकडून होणारे नुकसान थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत नाहीत. मसोली जंगलातील हत्ती शनिवारी संध्याकाळी या परिसरात आला आणि त्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हिरण्यकेशी नदी परिसर ओलांडताना शनिवारी सायंकाळी हत्ती गावातील काही जणांना दिसला. याबाबत त्यांनी वनविभागाला तातडीने माहिती दिली. हत्तीने रात्रीच्या सुमारास शोतात घुसून कापणी आणि मळणीस आलेल्या भात पिकासह उसाचे मोठे नुकसान केले. याआधीही मसोली परिसरातून येथे हत्ती आला होता व नुकसान करून पुन्हा मसोलीकडे परतला होता. आता पुन्हा एकदा हत्ती या परिसरात आला आहे. पावसाळ्यात मेहनत करून आलेले पिक मळून घरी नेण्याची वेळ आली असताना हत्ती पिकांचे नुकसान करत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

हत्ती आला आहे, दक्ष राहा; वनविभागाची सूचना
आजरा (रामतीर्थ ) जंगलक्षेत्रात मसोलीतील हत्ती आल्याची माहिती ग्रामस्थांनी देताच, आजरा वनविभाग पथक परिसरात दाखल झाले. हिरण्यकेशी नदी ओलांडून ‘रामतीर्थ’ परिसरातील शेतात आणि त्यानंतर वनविभागाच्या सुलगाव (ता. आजरा) रोपवाटिकेतून वनविभाग कार्यालय व रेस्ट हाऊसच्या भोवती हत्तीने फेरी मारली. त्यानंतर रोपवाटिकेच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडत आजरा-गडहिंग्लज मार्ग ओलांडून म्हसोबाच्या देवळाजवळून हत्ती सुलगाव हद्दीतील चोपडाईच्या डोंगरात गेला. हत्तीच्या पायाच्या ठशावरून हा मार्ग समजला आहे. त्यामुळे सुलगाव, चांदेवाडी, सोहाळे व हाजगोळी परिसरातील ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.