‘निसर्ग’ च्या फटक्याने विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत; 7 उपकेंद्रात काम सुरू

441

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका महावितरणला बसला. रत्नागिरी जिल्ह्यातील 47 पैकी 42 उपकेंद्रे पूर्ववत सुरू करण्यात यश आले असून आता जिल्ह्यातील 4 लाख 21 हजार बाधित वीजग्राहकांपैकी 3 लाख 66 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यासाठी अन्य जिल्ह्यांतून महावितरणची 9 पथके रत्नागिरीत आली आहेत.

‘निसर्ग’ चक्रीवादळाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. वादळाच्या या अस्मानी संकटातून महावितरणही सुटले नाही. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. तसेच मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी कोल्हापूर परिमंडलाकडून 6 व बारामती परिमंडलाकडून 3 अशी एकूण 9 महावितरणची पथके दाखल झाली आहेत. दुरुस्तीसाठी आवश्यक साधनसामुग्री व वाहनांसह ही सर्व पथके खेड व चिपळूण विभागात युद्ध पातळीवर काम करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात उच्च दाबाचे 2 हजार 927 तर लघु दाबाचे 4 हजार 897 खांब वादळाने जमीनदोस्त झाले आहेत. तर 47 उपकेंद्रांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. तीन दिवसांत वीज कर्मचार्‍यांनी केलेल्या कामामुळे 42 उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. यामध्ये बंद असलेल्या गुहागर, वेळणेश्वर, केळशीफाटा, हर्णै व वनौशी उपकेंद्रांपैकी वेळणेश्वर व वनौशी उपकेंद्र रविवारी उशिरापर्यंत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या