
कोरोना काळात घेतलेल्या लसींमुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. अशातच टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी सोशल मीडियावर लसीकरणाबाबतचा आपला वैयक्तिक अनुभव शेअर केला. त्यामुळे आता कोविड-19 लसींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटले असून लसीकरणाच्या धोरणाबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एलॉन मस्क यांनी ‘X’वर याबात एक पोस्ट शेअर करत अनेक गंभीर दावे केले आहेत. त्यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, “कोविड-19 लसींचे डोस नक्कीच गरजेपेक्षा जास्त आणि वारंवार देण्यात आले. लस उपलब्ध होण्यापूर्वीच मला ‘वुहान विषाणू’ची (Wuhan virus) लागण झाली होती. तो अनुभव त्रासदायक होता, पण भयानक नव्हता. मात्र, लसीच्या दुसऱ्या डोसमुळे माझी प्रकृती खालावली होती. हा डोस घेतल्यावर मला अक्षरशः रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. आता आपण जगणार की नाही, अशी भीती मला वाटू लागली होती, असे मस्क यांनी सांगितले.
The vaccine dosage was obviously too high and done too many times.
I had the original Wuhan virus before there was any vaccine and it was much like any other cold/flu. Bad, but not terrible.
But my second vaccine shot almost sent me to the hospital. Felt like I was dying. https://t.co/rFuUpzBkKH
— Elon Musk (@elonmusk) April 12, 2026
मस्क यांच्या या विधानानंतर अमेरिकेच्या माजी काँग्रेस सदस्य मार्जोरी टेलर ग्रीन यांनीही लसींवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी दावा केला की अनेक लोकांना लसीमुळे गंभीर आजार झाले असून अनेकांचा जीवही गेला आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांनीही एका मुलाखतीत सांगितले की, देशात लसींच्या दुष्परिणामांवर पुरेशी चर्चा होत नाहीये आणि त्यांना स्वतःलाही लसीनंतर त्रास सहन करावा लागला होता, असे त्यांनी सांगितले.
Mintने दिलेल्या वृत्तानुसार, 19 मार्च 2026 रोजी जर्मनीच्या संसदेत झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर हा लसीकरणाचा मुद्दा चर्चेत आला. या चर्चेदरम्यान माजी विषशास्त्रज्ञ (Toxicologist) डॉ. हेल्मुट स्टर्झ यांनी सांगितले की, महामारीच्या काळात प्रचंड दबावामुळे लसींच्या दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास पूर्ण होऊ शकला नाही. कर्करोगासारखे धोके तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या चाचण्या पूर्ण होण्याआधीच लसी बाजारात आणल्या गेल्या, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
सोशल मीडियावर या प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. डॉ. हेल्मुट स्टर्झ यांच्या विधानानंतर लसींची सुरक्षितता आणि त्यांच्या मंजुरीची प्रक्रिया यावरून जागतिक स्तरावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.



























































