एल्फिन्स्टन पुलाचा सांगाडा मध्य रेल्वेच्या हद्दीत ‘लटकला, 12 तासांच्या मोठ्या ब्लॉकसाठी रेल्वे बोर्डाची अद्याप परवानगी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचे पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील पाडकाम वेगाने पूर्णत्वास नेण्यात आले. मात्र मध्य रेल्वेच्या हद्दीतील पुलाचा सांगाडा हटवण्याचे काम ‘लटकले’ आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ‘महारेल’ने मध्य रेल्वे मार्गावर 12 तासांचा मोठा ब्लॉक मागितला आहे. त्याला रेल्वे बोर्डाने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मध्य रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे पाडकाम रेंगाळण्याची चिन्हे आहेत.

प्रभादेवी रेल्वे स्थानकातील 112 वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी वरळी-शिवडी उन्नत मार्गातील डबलडेकर रोड ओव्हर ब्रीज उभारण्यात येणार आहे. हे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल) ठेवले आहे. त्याअनुषंगाने 800 मेट्रिक टन क्षमतेच्या दोन महाकाय क्रेनचा वापर करून एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम हाती घेण्यात आले आहे. ‘महारेल’ने सर्वप्रथम मध्य रेल्वेच्या हद्दीतून पाडकाम सुरू करण्याचे नियोजन केले होते. मोठय़ा प्रमाणावर लोकल आणि मेल-एक्सप्रेसची वाहतूक होत असल्याने जास्त तासांच्या ब्लॉकसाठी रेल्वे बोर्डाच्या परवानगीची गरज आहे. बोर्डाकडून वेळीच परवानगी न मिळाल्याने ‘महारेल’ने पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील पाडकाम सुरू केले. रात्रीच्या वेळेत छोटे-छोटे ब्लॉक घेत रेल्वे वाहतुकीवर अधिक परिणाम होऊ न देता पश्चिमेकडील पाडकाम आणि गर्डर्सचे कटिंग पूर्ण करण्यात आले. मात्र मध्य रेल्वे मार्गावरील 12 तासांच्या ब्लॉकला रेल्वे बोर्डाची परवानगी अद्याप मिळत नसल्याने पाडकामाचा वेग कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पूल पाडकामाचे ‘महारेल’पुढे आव्हान

‘महारेल’ने सुरुवातीला मध्य रेल्वेकडे 15 तासांच्या ब्लॉकसाठी विनंती केली होती. त्यावर एकमत न झाल्याने 12 तासांच्या ब्लॉकचा सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आला. तो प्रस्तावदेखील रेल्वे बोर्डाकडे पडून आहे. रेल्वे बोर्ड मोठय़ा ब्लॉकला परवानगी देणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. अशा स्थितीत छोटे-छोटे ब्लॉक घेऊन एल्फिन्स्टन पुलाचे अर्धवट स्थितीतील पाडकाम पूर्ण करण्याचे आव्हान ‘महारेल’पुढे उभे ठाकले आहे.