
बीड-राज्यभरातील डाक कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीने आज बुधवारी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची झोप उडवली. बीड येथील बशीरगंज-राजुरीवेस येथील मुख्य पोस्ट कार्यालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तातडीने पोस्ट ऑफिस रिकामे करून बॉम्ब शोध व नाशक पथकाचे (बीडीडीएस) पीएसआय आहेर व त्यांच्या सहकार्यांनी तपासणी मोहिम हाती घेतली. अत्याधुनिक यंत्राद्वारे पोस्टातील प्रत्येक पार्सल तपासण्यात आले. कोपरा न् कोपरा तपासल्यानंतर काहीच आढळून आले नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनासह पोस्ट ऑफिसमधील यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला.
डाक विभागाच्या विभागीय कार्यालयाला एका निनावी ई-मेलद्वारे महाराष्ट्रभरातील कार्यालयांमध्ये स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. हा ई-मेल बीड कार्यालयाला प्राप्त होताच, याची माहिती तातडीने पोलीस प्रशासनासह जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिसला देण्यात आली. धमकीचे गांभीर्य ओळखून बीड शहरातील बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ताफ्यासह घटनास्थळी दाखल होत पुढील पावले उचलण्यात आली. कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. पोस्ट ऑफिसमधील कानाकोपरा शोधला. बराच वेळ चाललेल्या या शोधमोहिमेत कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आलेली नाही. पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले असून पोलीस या ई-मेलचा उगम शोधण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान हा ई-मेल कोईंबतूर येथून आल्याचे सुत्रांकडून समजते. ई-मेल करणार्या व्यक्तीने त्यावर मला जिवितहानी करायची नाही, फक्त सार्वजनिक प्रॉपर्टीचे नुकसान करायचे आहे. 12.10 मिनिटांनी बॉम्बस्फोट करणार आहे असाही उल्लेख त्यामध्ये होता असे सांगण्यात येते, पोलीस पुढील तपास करत आहेत.
माजलगाव येथील पोस्ट कार्यालयात बॉम्बची अफवा
माजलगाव-येथील पोस्ट कार्यालयात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने बुधवारी एकच खळबळ उडाली. जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आला आहे. या पद्धतीचा मेल जिल्हा पोस्ट कार्यालयात आल्याच्या प्रकारानंतर माजलगाव पोस्ट ऑफिसमध्ये देखील त्याची खबरदारी घेण्यात आली. दुपारी बाराच्या सुमारास संपूर्ण पोस्ट कार्यालय रिकामे करण्यात येऊन सर्व कर्मचारी व नागरिक पोस्ट कार्यालयाच्या बाहेर येऊन थांबले. नेमके काय झाले आहे हे कोणालाही कळत नव्हते वरिष्ठांच्या सूचनेनंतर येथील पोस्ट मास्तर यांनी ऑफिसमधील सर्व टपाल, पार्सल यांची तपासणी केली. त्यात आक्षेपार्ह असे काहीही आढळून आले नाही, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.






























































