
इस्लाममुळे संपूर्ण जग धोक्यात आले आहे. इस्लामी कट्टरवादाशी लढण्यासाठी जगाने एकत्र आले पाहिजे असा बॉम्बगोळाच फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी टाकला. मॅक्रो यांनी इस्लामवर यापूर्वीही तोफ डागली आहे.
राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी एका कार्यक्रमात बोलताना इस्लामच्या कट्टरवादावर बोट ठेवले. इस्लामच्या कट्टरवादामुळे संपूर्ण जग धोक्यात आले असून त्याविरोधात व्यापक लढा उभारण्याची गरजही मॅक्रो यांनी बोलून दाखवली. फ्रान्समध्ये जवळपास 60 ते 65 लाख मुस्लिम लोकसंख्या आहे. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रपती मॅक्रो यांनी परदेशी इमामांना फ्रान्समध्ये येण्यास बंदी घातली होती. कट्टरवाद रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मॅक्रो यांनी स्पष्ट सांगितले होते. प्रान्समध्ये जे इमाम आहेत त्यांना फ्रेंच भाषा आलीच पाहिजे तसेच त्यांना कायद्याचे सक्तीने पालन करावे लागेल अशी तंबीही त्यांनी दिली होती.























































