समृद्धी महामार्गाचा भराव ढासळला, गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण टोल प्लाझा परिसरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गाचा भराव ढासळला, त्यामुळे या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर आणि देखभालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अवघ्या तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या महामार्गाच्या एका रात्रीच्या पावसातच झालेल्या नुकसानीमुळे नागरिकांमधून “हा टिकाऊ विकास की टिकाऊ धोका?” असा उपरोधिक सवाल केला जात आहे. परिसरात साचलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्याखालील माती व दगड वाहून गेले, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो.

हजारो कोटींचा खर्च, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तेची हमी अशा गाजावाज्यानंतरही वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांनी ‘समृद्धी महामार्गा’चा विश्वास डळमळीत केला आहे. यापूर्वीही छत्रपती संभाजीनगर, इगतपुरी व माळीवाडा परिसरात पुलांचे स्लॅब कोसळणे व पृष्ठभाग खचणे सिमेंटच्या रस्त्याला तडे जाणे रात्री गाड्यांवर दगडफेक होणे अशा घटना घडल्या होत्या.

जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेला हा महामार्ग वारंवार कोसळत असेल, तर शासन व ठेकेदारांनी जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी होत आहे.