
कुवैतहून तेलंगणातील हैदराबाद शहराकडे जाणारे इंडिगोच्या विमानाचे मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान हवेतच उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. विमानामध्ये मानवी बॉम्ब असल्याचा ई-मेल आला होता. त्यानंतर कुवैत-हैदराबाद विमानाचे मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान सुरक्षित उतरवल्यानंतर सुरक्षा यंत्रणा विमानाची तपासणी करत आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
कुवैतहून हैदराबादच्या दिशेने येणाऱ्या इंडिगोच्या एअरबस A321-251NX या विमानामध्ये आत्मघातकी बॉम्ब हल्ला करण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमान मुंबईकडे वळवण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने लँडिंग करण्यात आले. त्यानंतर विमानाची सखोल तपासणी करण्यासाठी एका आयसोलेशन बेमध्ये (Isolation Bay) हलवण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत इंडिगो एअरलाइन्सकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
Emergency landing at Mumbai Airport after a bomb threat in a Kuwait-Hyderabad IndiGo flight. More details awaited.
— ANI (@ANI) December 2, 2025
फ्लाईट रडार 24 च्या माहितीनुसार, इंडिगोच्या एअरबस A321-251NX या विमानाने मध्यरात्री 1 वाजून 56 मिनिटांनी उड्डाण घेतले होते. हे विमान हैदराबादच्या दिशेने निघाले होते. मात्र यात मानवी बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्यानंतर हे विमान तातडीने मुंबईकडे वळवण्यात आले आणि सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.
दरम्यान, याआधी 23 नोव्हेंबर रोजी बहरीनहून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर हे विमानही मुंबईकडे वळवण्यात आले होते आणि मुंबईत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. मात्र नंतर ही एक अफवा असल्याचे समोर आले होते.




























































