
अतिक्रमणे पाडण्यासाठी गेलेल्या मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकावर मंगळवारी बाबा बंगाली चौक परिसरात दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी आरोपींवर कारवाई करावी, तसेच अतिक्रमण पथकास कारवाईवेळी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशा मागण्या करीत मनपा कामगार युनियनने पुकारलेल्या आजच्या ‘काम बंद’ आंदोलनात मनपा कामगारांनी सक्रिय सहभाग घेतला. अत्यावश्यक सेवा वगळता, मनपा मुख्यालयासह चारही प्रभाग कार्यालयांतील कामकाज बंद ठेवण्यात आले. त्यामुळे मनपा कार्यालयात केवळ अधिकाऱयांची उपस्थिती दिसून आली.
महापालिका मुख्यालयात आज सकाळी गेट सभा घेतल्यानंतर मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱयांनी आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेतली. आरोपींना अद्यापि अटक झालेली नाही. आरोपींना अटक झाल्यास उद्यापासून मनपाचे कामकाज सुरळीतपणे सुरू करू. तसेच अतिक्रमण पथकास कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्त देण्यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र द्यावे, अशी मागणी लोखंडे यांनी आयुक्तांकडे केली.
येथून पुढे चारही प्रभाग कार्यालय विनापोलीस बंदोबस्त अतिक्रमणे काढण्याची कारवाई करणार नाहीत. तसेच यासंदर्भात प्रभाग अधिकाऱयांना पत्र देण्यात यावे, असेही लोखंडे म्हणाले. यासंदर्भात आयुक्तांनी सकारात्मकता दाखविल्याचे त्यांनी सांगितले. अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर केलेल्या दगडफेकीत मनपा कर्मचारी दत्तात्रय केशव जाधव (वय 54) जखमी झाले होते. याप्रकरणी प्रभाग अधिकारी मेहेर लहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात 10 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींच्या शोधार्थ दोन पथके रवाना
अतिक्रमणविरोधी पथकावर केलेल्या दगडफेकप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रभाग अधिकारी लहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सादिक बाबूलाल शेख, सोफियान सादिक शेख, अजहर सादिक शेख, अलिज सादिक शेख, आसिफ नूरमोहम्मद कुरेशी, शहेबाज जब्बार कुरेशी, निसार तांबोळी, अमजद जब्बार कुरेशी, निसार कुरेशी (भंगारवाला) (सर्व रा. झेंडीगेट व बाबा बंगाली परिसर) यांच्यासह इतर पाच ते सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी कोतवाली पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. अद्यापि एकही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही.


























































