
सामना ऑनलाईन, मुंबई
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची मुंबईमध्ये शुक्रवारी जाहीर सभा झाली. राहुल गांधी यांचे भाषण सुरू असतानाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला असून या व्हीडिओमध्ये राहुल यांचे भाषण सुरू असताना असंख्य खुर्च्या रिकाम्या होत्या असं स्पष्टपणे दिसत आहे. राहुल गांधी मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढवत असताना काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांचे भाषण ऐकायला आलेली मंडळी घराकडे परत जाताना दिसत होती.
मुंबईत बीकेसी येथील सभेमध्येही राहुल गांधी यांनी मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ला लक्ष्य केले. मोदींच्या काळात ‘मेड इन चायना, मेड इन जर्मनी’च्या वस्तू आल्या पण आपले सरकार आल्यास ‘मेड इन धारावी’, ‘मेड इन मुंबई’ दिसेल असे ते म्हणाले. मोदींनी नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या अशा पंधराजणांचे साडेतीन लाख कोटींचे कर्ज माफ केले, मग लहान कर्ज घेणाऱ्या युवकांचे कर्ज ते माफ का करू शकले नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


























































