दया नायक यांना एसीपीपदी बढती

गेल्या तीन दशकांत उल्लेखनीय कामगिरी बजावणारे व ‘चकमक फेम’ अशी पोलीस दलात ओळख असणारे दया नायक यांच्यासह चार पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली. बढतीचे आदेश राज्य शासनाने आज जारी केले.

1995 साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाल्यानंतर मुंबईत उफाळलेले गँगवॉर व अंडरवर्ल्ड कारवायांचा बीमोड करण्यात दया नायक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अतिरेकी कारवाया तसेच ड्रग्ज माफियांविरोधात दया नायक यांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी एक हजाराच्या वर गुन्हेगार व समाजकंटकांवर कारवाई करत आपल्या धडाकेबाज कामाची छाप पाडली. अनेक गुंडांना चकमकीत यमसदनी धाडणारे ‘चकमेक फेम’ दया नायक यांच्यासह जीवन खरात, दीपक दळवी आणि पांडुरंग पवार या चार अधिकाऱयांना आज एसीपीपदी बढती देण्यात आली. हे सर्व अधिकारी नियत वयोमानानुसार 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

अधिकारी बढतीच्या प्रतीक्षेत

गेल्या कित्येक दिवसांपासून एसीपींच्या बढत्या लटकलेल्या आहेत. असंख्य अधिकारी एसीपी बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. पण शासनाकडून हिरवा कंदील दाखवला जात नसल्याने बरेच अधिकारी बढती कधी मिळणार याची वाट पाहत आहेत.