केवळ एकवीसशे रुपये आणि चांदीच्या चार नाण्यांसाठी निर्दयी भाडोत्रीने हातोड्याचे घाव घालत संपूर्ण कुटुंबच संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फक्त झटपट पैसे कमवण्याच्या उद्देशाने भाडोत्री आरिफ अन्सारी याने घरमालक मुकुंद राठोड, त्यांची पत्नी कांचन राठोड व मुलगी संगीता या तिघांची हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला.
फर्निचरच्या दुकानात काम करणाऱ्या आरिफ अन्सारी याने नेहरोली येथील बोंद्रे आळीत राहणाऱ्या राठोड कुटुंबीयांकडे
भाड्याने घर घेतले. मात्र दिवसभर काम करून पैसे मिळत नसल्याने त्याने झटपट पैसे कमवण्यासाठी चोरी करण्याचे ठरवले. घरमालकाकडे भरपूर पैसे असतील असे समजून त्याने राठोड यांचेच घर फोडले. यावेळी राठोड कुटुंबीयांना याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी राठोड कुटुंबातील तिघांची हातोड्याने घाव घालून हत्या केली. मात्र त्यावेळी त्याला घरातून फक्त एकवीसशे रुपये आणि चांदीच्या चार नाणी मिळाल्याची कबुली आरिफने पोलिसांना दिली.
फिल्मी स्टाईलने अटक
तिहेरी हत्याकांडाचा तपास सुरू असताना भाडोत्री गायब असल्याचे कळताच पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक यंत्रणा व सीसीटीव्हीच्या मदतीने तपास केला असता आरिफ उत्तर प्रदेशला पळून गेल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उत्तर प्रदेशला पोहोचल्यानंतर त्यांनी आरिफचा शोध सुरू केला. मात्र उत्तर प्रदेश पोलिसांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार गावाबाहेर लपून बसलेल्या आरिफच्या फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी मुसक्या आवळल्या.