
गेल्या पाच दिवसांपासून अमेरिकेत सुरू असलेल्या शटडाऊनचे गंभीर परिणाम होत आहेत. अण्वस्त्रांची सुरक्षा व देखभालीसाठी राष्ट्रीय अण्वस्त्र सुरक्षा प्रशासनाकडे आठ दिवसांचा निधी शिल्लक आहे. त्यानंतर देशाची सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचे सचिव ख्रिस राईट यांनी व्यक्त केली आहे.
रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यात निधी विधेयकावर एकमत न झाल्याने अमेरिकेत शटडाऊन सुरू झाला आहे. याचा परिणाम सर्व स्तरावर होऊ लागला आहे. निधी संपल्यास एनएनएसएला कर्मचारी कपात करावी लागेल, असे सचिव राईट यांनी एका मुलाखतीत सांगितले.
ऊर्जा विभागाच्या 60 टक्के कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय रजेवर पाठवले जाऊ शकते. आण्विक सिस्टमची देखभाल करणारे किंवा अद्वितीय उपकरणांचे निरीक्षण करणारे कर्मचारी कायम राहतील. अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी काम करणारे कर्मचारी कर्तव्यावर राहतील, असे नियोजन आहे.
ट्रम्प अपयशी
ट्रम्प शुक्रवारी सलग चौथ्यांदा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे हा शटडाऊन सुरू झाला आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या निधी विधेयकाला संसदेच्या वरिष्ठ सभागृहात (सिनेट) 54 मते मिळाली.