मनी लॉण्डरिंगप्रकरणी रॉबर्ट वढेरा यांच्यावर ईडीचे आरोपपत्र

robert-vadra

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती, उद्योजक रॉबर्ट वढेरा अडचणीत आले आहेत. एका मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यात अन्य काही लोकांचीही नावे आहेत.

हरयाणातील मानेसर-शिकोहपूर येथील एका वादग्रस्त जमिनी व्यवहाराचे हे प्रकरण आहे. वढेरा संचालक राहिलेल्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी पंपनीने 2008 साली ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून शुकोहपूर येथील 3.5 एकर जमीन खरेदी केली होती. चार वर्षांनंतर ही जमीन रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित पंपनी डीएलएफला 58 कोटींमध्ये विकण्यात आली. ऑक्टोबर 2012 मध्ये हरयाणाच्या भूमी अभिलेख व नोंदणी कार्यालयाने हा व्यवहार बेकायदा ठरवून रद्द केला.

याप्रकरणी ईडीने 2018 साली रॉबर्ट वढेरा, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल, भूपिंदरसिंह हुडा, डीएलएफ आणि एका प्रॉपर्टी डीलरच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून चौकशी सुरू झाली होती. ईडीने याप्रकरणी 15 एप्रिल रोजी वढेरा यांची चौकशी केली होती. आता थेट आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 58 कोटींच्या या व्यवहारात मनी लॉण्डरिंग झाल्याचा ईडीला संशय आहे. दरम्यान, वढेरा यांची 18 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. हरयाणातील इतर अनेक काँग्रेस नेत्यांचीही चौकशी झाली.