तृणमूल काँग्रेसची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममतादीदींचा संताप, भाजप घाणेरडं राजकारण करत असल्याची टीका

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी राजकीय सल्लागार आणि रणनीती फर्म आय-पॅक‘ (I-PAC) चे कार्यालयांवर आणि या फर्मचे संचालक प्रतीक जैन यांच्या घरावर छापा टाकला. मनी लॉण्डरिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

प्रतीक जैन हे तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रमुखही आहेत. त्यांच्या निवासस्थानीही ईडीने झाडाझडती घेतली. याची माहिती मिळताच ममता बॅनर्जी यांनी प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी धाव घेतली. राजकीय सुडबुद्धीतून ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

ईडी आणि अमित शहा यांचे काम तृणमूल काँग्रेसच्या हार्ड डिस्क, अंतर्गत कागदपत्रे, उमेदवारांची यादी आणि पक्षाची संवेदनशील संघटनात्मक माहिती जप्त करणे आहे का? शहा हे निकृष्ट गृहमंत्री असून ते देशाची सुरक्षा करण्यास समर्थ नाहीत, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, एकीकडे ते पश्चिम बंगालमध्ये एसआयआरद्वारे मतदारांची नावे हटवण्याचे काम करत आहेत. दुसरीकडे अशा प्रकारची कारवाई केली जात आहे. त्यांनी आमच्या आयटी प्रमुखाच्या घरावर छापा टाकला आणि पक्षाची कागदपत्र, हार्ड डिस्क जप्त करत होते. यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची सविस्तर माहिती आहे. ही कागदपत्र मी परत मिळवली आहेत.

घटनाक्रम –

  • गुरुवारी सकाळी ईडीने राजकीय सल्लागार आणि रणनीती फर्म ‘आय-पॅक‘ (I-PAC) चे कार्यालयांवर आणि या फर्मचे संचालक प्रतीक जैन यांच्या घरावर छापा टाकला.
  • सकाळपासून ही कारवाई सुरू होती, मात्र साडे अकरा वाजता याला वेगळे वळण मिळाले
  • सर्वात आधी कोलकाताचे पोलीस महासंचालक प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी पोहोचले
  • त्यानंतर काही वेळातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी पोहोचल्या
  • काही वेळानंतर त्या घराबाहेर आल्या. त्यांच्या हातामध्ये एक हिरव्या रंगाची फाईल होती.
  • बाहेर येताच त्यांनी अमित शहांच्या इशाऱ्यावर ही कारवाई सुरू असल्याचा आरोप केला
  • तृणमूल काँग्रेसची रणनीती, आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य उमेदवारांची माहितीसह इतर महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
  • यानंतर त्या ‘आय-पॅक‘ (I-PAC) च्या कार्यालयात पोहोचल्या.
  • ममता बॅनर्जी तिथे 15 ते 20 मिनिटं होत्या. मुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकारीही त्यांच्या सोबत होते. ते हातात फाईल्स घेऊन आले आणि ममता बॅनर्जी यांच्या गाडीत ठेवल्या.
  • ममता बॅनर्जी यांनी ईडीच्या कारवाईवर सवाल उपस्थित करत तृणमूल काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.