
सामना प्रतिनिधी । नगर
प्लास्टीक बंदीनंतर आता उर्वरीत प्लास्टिकचा वापर कशामध्ये करायचा असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काही ठिकाणी रस्ते तयार करताना प्लास्टिकचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. आता नगरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्लास्टिक कचर्यापासून वीट निर्मिती करुन अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्हास होत आहे. प्लास्टिक वापरामुळे कचर्याचे डोंगर उभे रहात आहेत. स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संस्थेने संशोधन करत प्लास्टिकच्या कचर्यापासून वीट तयार केली आहे.
नेप्ती येथील श्रीछत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी शिकणारे स्मायलींग अस्मिताचे यशवंत तोडमल, राहुल झिने, पंकज निमसे, तसेच विद्यार्थी संस्थेचे शुभम मिसाळ, शेख वाहेद, सचिन सापते, गायत्री शेवाळे, निकिता कुलट, मयुरी वाईकर आदींनी प्लास्टिक घनकचर्यापासून विटा बनवल्या आहेत. या विटांची क्षमता मातीच्या विटापेक्षा तीनपट अधिक असून त्यांचे आयुष्य शंभर वर्षांपेक्षा अधिक असल्याचा दावा तोडमल यांनी केला. हे संशोधन हवा व माती प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले.
नेहमीच्या मातीच्या विटांऐवजी प्लास्टिकच्या विटांचा वापर केल्यास पर्यावरणाचा र्हास रोखण्यात मदत होईल. प्लास्टिकपासून पेव्हिंग ब्लॉक, रस्ते निर्मितीसाठी प्रयत्न आहे, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले. या विटा, तसेच पेव्हींग ब्लॉक व प्लास्टिकपासून डांबर निर्मितीसाठी जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे व माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर आर्थिक मदत करत आहेत.
संशोधनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. देशपांडे, विभागप्रमुख सतीश पळसकर, प्रा. गिरीश पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्लास्टिक विटांच्या निर्मितीसाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन राहुल शिंदे व पंकज निमसे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अजिंक्य युवा प्रतिष्ठान व राजीव राजळे युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येकी दहा हजारांची मदत मिळाली आहे.






























































