पाच लाखांच्या खंडणीसाठी अभियंत्यांना धमकी, लाथाबुक्क्यांनी मारहाण, कांदिवलीत मिंध्यांच्या पदाधिकाऱ्यांची दादागिरी

मिंधे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कांदिवली पश्चिमेला दादागिरी सुरू आहे. सत्तेचा माज आलेल्या त्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या अभियंत्यांना पाच लाखांच्या खंडणीसाठी धमकावून त्यांना बांबू व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात मस्तवाल पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिव्हिल इंजिनीयर आशीष मल्हा (29) यांच्या तक्रारीवरून लालसिंग राजपुरोहित, गणेश पवार, पिंटो जयस्वाल, विकास गुप्ता, नीलेश जयस्वाल आणि सुरेश शहा या मस्तवाल पदाधिकाऱ्यांविरोधात खंडणीसाठी धमकावून अभियंत्यांना जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्हा हे बी.एस.सी.पी.एल इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीत सिव्हिल इंजिनीयर म्हणून काम करतात. सदर कंपनीला कांदिवली येथील आर वॉर्डमधील रस्त्याच्या काँक्रिटायझेशनच्या कामाची वर्कऑर्डर मिळाली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून इराणी वाडी रस्ता क्रमांक 3 येथील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लालसिंग राजपुरोहित, गणेश पवार या दोघांनी मिळून रस्त्याचे कामकाज सुरू ठेवण्याकरिता पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पण खंडणी दिली नाही म्हणून इराणी वाडी क्रमांक 3 येथील दत्तानी मार्गावर असलेल्या राजपुरोहित याच्या कार्यालयात बोलावून घेतले.

कार्यालयात गेल्यावर पुन्हा पाच लाखांच्या खंडणीसाठी धमकावण्यात आले. पैसे देण्यास नकार देताच राजपुरोहित, गणेश पवार, पिंटो जयस्वाल व अन्य 10 ते 15 जणांनी मिळून मला व अभियंता विश्वनाथ चौरसिया, विनीत ओमप्रकाश सिंग यांना कार्यालयाबाहेर नेऊन शिवीगाळ करत बांबू तसेच लाथबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तेथे खोदलेल्या खड्ड्यात ढकलले. अशा प्रकारे हे लोक वारंवार त्रास देत असल्याचे आशीष मल्हा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. मल्हा यांच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खंडणीसाठी अभियंत्यांना शिवीगाळ व मारहाण करणारा लालसिंग राजपुरोहित हा मिंधे गटाचा कांदिवलीतील विभागप्रमुख आहे. तर गणेश पवार आणि सुरेश शहा हे दोघे शाखाप्रमुख, पिंटो जयस्वाल हा चालक आणि विकास गुप्ता हा उपविभागप्रमुख असून नीलेश जयस्वाल हा विधानसभा संघटक आहे.

आधी चार लाखांची खंडणी वसूल

फेब्रुवारीमध्ये बी.एस.सी.पी.एल इन्फ्रास्ट्रक्चर लि. सिस्टर कंपनीमधील अभियंता महिपाल व्यास व त्रिशीक टांक यांना लालसिंग राजपुरोहित याचा सहकारी विकास गुप्ता याने जीवे मारण्याची धमकी देत विकास व नीलेश जयस्वाल यांनी कांदिवलीत काम करण्याकरिता खंडणीची मागणी केली होती. या लोकांनी धमकावत महिपाल व टांक यांच्याकडून लालसिंग राजपुरोहित याच्याकरिता चार लाख रुपये खंडणी घेतली होती. मालाड पूर्वेकडील रहेजा टाऊनशिपजवळ ही खंडणीची रक्कम घेण्यात आली होती, असेही आशीष मल्हा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.