
58 धावांत इंग्लंडचे आघाडीचे चारही फलंदाज बाद झाल्यावर पाकिस्तानी संघ जश्ने जीतच्या माहौलमध्ये पोहोचला होता. पण तेव्हा हॅरी ब्रूकने विल जॅक्सच्या साथीने संयमी अन् तितकीच वेगवान खेळी करत इंग्लंडला पराभवाच्या गर्तेतून बाहेरच आणले नाही तर विजयपथावर नेले. संस्मरणीय शतक साजरे करताच त्याने पाकिस्तानला आपल्या विकेटचा आनंद साजरा करण्याची संधी दिली. पाकिस्ताननेही झटपट आणखी दोन विकेट घेत सामन्यात थरार आणला, पण सहा चेंडूंत 3 धावांची गरज असताना जोफ्रा आर्चरने सलमान मिर्झाला चौकार खेचत सामनाच नव्हे तर पाकिस्तानचेही पॅकअप जवळजवळ निश्चित केले. एवढेच नव्हे तर या सलग विजयासह इंग्लंडने आपले उपांत्य फेरीचेही तिकीट सर्वप्रथम बुक केले.
आफ्रिदीच्या भेदकतेने इंग्लंड भेदरली
165 धावांचे आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या इंग्लंडला पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टला धक्का देत शाहिन शाह आफ्रिदीने प्रतिस्पर्ध्यांच्या पोटात गोळा आणला. मग पुढच्याच षटकात जोस बटलरलाही (2) माघारी धाडले. जेकब बेथेल (8) आणि टॉम बॅण्टन (2) या दोघांची विकेट काढत इंग्लंडची 4 बाद 58 अशी दुर्दशा करत पाकिस्तानने सामन्यावर वर्चस्व निर्माण केले होते. पण हॅरी ब्रूकने झुंजार खेळ करत पाकिस्तानी संघाचा चेहराच पांढरा फिकट केला. त्याने आधी सॅम करणसह 45, मग विल जॅक्सच्या मदतीने 52 धावांची भागी करत संघाला विजयासमीप नेले. हॅरीने 51 चेंडूंत शंभरी गाठत आपले टी-20 क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक साजरे केले. 18 चेंडूंत 10 धावांची गरज असताना ब्रूक 100 धावांवर आफ्रिदीचा बळी ठरला. या विकेटमुळे पाकिस्तानने सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. 19 व्या षटकात मोहम्मद नवाजने
जॅक्स (28) आणि जॅमी ओव्हरटनची विकेट काढत इंग्लंडची हवा टाइट केली, पण जोफ्राने 20 व्या षटकांत चौकार खेचत पाकिस्तानच्या विजयाचे मनसुबे उद्ध्वस्त केले. आफ्रिदीने 30 धावांत 4 विकेट घेत सामन्यात जान आणली होती. त्याआधी साहिबजादा फरहानच्या 63 धावांनी पाकिस्तानच्या 164 धावांचा पाया रचला.
महामुकाबला कठीण
इंग्लंडच्या विजयामुळे या गटात केवळ दोन संघ चार-चार गुण मिळवू शकणार आहेत. इंग्लंडने सेमी गाठली असून पाकिस्तान चमत्काराने उपांत्य फेरीत पोहोचला तरी तो गटात दुसराच असेल. तसेच हिंदुस्थानचीही हीच अवस्था असल्यामुळे उपांत्य फेरीत महामुकाबला कठीण आहे.



























































