इंग्लंडने पाचव्या कसोटीसह मालिका 4-1ने जिंकली

सामना ऑनलाईन, लंडन

हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱयाचा शेवट कडू झाला. वन डे मालिका गमावणाऱया टीम इंडियाला कसोटी मालिकेत 4-1 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. लोकेश राहुल (149 धावा) व रिषभ पंत (114 धावा) या जोडीने सहाव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी करताना वैयक्तिक शतकेही झळकावली. पण दोघांची झुंज अपयशी ठरली. विराट कोहलीच्या हिंदुस्थानला अखेर 118 धावांनी पराभूत व्हावे लागले. जो रूटच्या इंग्लंडने 4-1 अशा फरकाने मालिका खिशात घातली. सॅम करण व विराट कोहली यांची मालिकावीर म्हणून तर अखेरचा कसोटी सामना खेळणाऱया ऑलिस्टर कूकची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. याप्रसंगी जो रुटच्या संघाने आपल्या संघसहकाऱयांना विजयाचे गोड गिफ्ट दिले.

जोडी जमली

हिंदुस्थानचे फलंदाज ढेपाळत असतानाच लोकेश राहुल व रिषभ पंत या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावले. लोकेश राहुलने एक षटकार व 20 चौकारांसह 149 धावांची खेळी केली. हे त्याचे पाचवे शतक. पहिलीच कसोटी मालिका खेळणाऱया रिषभ पंतनेही त्याच्या तोडीसतोड कामगिरी केली. त्याने चार गगनभेदी षटकार व 15 नेत्रदीपक चौकारांसह 114 धावा फटकावल्या. हे त्याचे पहिलेच शतक. या दोघांखेरीज टीम इंडियाच्या एकालाही डाव सावरता आला नाही. इंग्लंडकडून जेम्स ऍण्डरसनने तीन, सॅम करण व अदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. लोकेश राहुल व रिषभ पंत या दोघांनाही अदिल रशीदनेच बाद केले.

ऍण्डरसनने मॅग्राला टाकले मागे

इंग्लंडचा तेज गोलंदाज जेम्स ऍण्डरसन याने कसोटी कारकिर्दीत 564 बळी गारद करीत ग्लेन मॅग्राच्या 563 बळींना मागे टाकले. आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाज बाद करणाऱया तेज गोलंदाजांच्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे. मुथय्या मुरलीधरन (800 बळी), शेन वॉर्न (708) व अनिल कुंबळे (619) हे फिरकीवीर पहिल्या तीन स्थानावर आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या