
निसर्गरम्य कोकण, तिथला अथांग समुद्र आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रहस्यमयी कथा नेहमीच सर्वांना भुरळ घालतात. कोकणातील याच गूढ वातावरणावर आधारित एक नवी रंजक कथा झी स्टुडिओज लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ‘तुंबाडची मंजुळा’ असे या नव्या चित्रपटाचे नाव असून, होळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचे एक आगळेवेगळे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये एका घराच्या अर्धवट बंद दाराआड दिसणारा गूढ चेहरा आणि बाहेर पडण्यासाठी धडपडणारे हात पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
View this post on Instagram
झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या 5 जून 2026 रोजी, म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विविध कोरगावकर हे नव्या दमाचे दिग्दर्शक चित्रपट सृष्टीत आपले पदार्पण करत आहेत. चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी सांभाळली आहे. या कथेत ‘मंजुळा’ कोण असेल आणि यात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले तरी पोस्टरने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आणले आहे.


























































