
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये असून रावळपिंडीपासून खैबरपख्तून्ख्वापर्यंत कुठेही हल्ला करू शकतो, असे हवाई संरक्षण दलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सुमेर इवान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्याने मुख्यालय रावळपिंडीहून खैबरपख्तूनख्वा येथे हलवले तरी ते आमच्या रेंजमध्ये राहील, असा दावाही त्यांनी ‘एएनआय’शी बोलताना केला आहे.
दुसरीकडे ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही, ते केवळ थांबवण्यात आले आहे. हाफिज सईद, सज्जाद मीर आणि झकीउर रहमान लखवीसारख्या मोठय़ा दहशतवाद्यांना हिंदुस्थानच्या स्वाधीन करावे, अशी मागणी पाकिस्तानकडे करण्यात आली आहे, असे इस्रायलमधील हिंदुस्थानचे राजदूत जे. पी. सिंह यांनी म्हटले आहे. त्यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरीही हिंदुस्थानी लष्कर सतर्क असल्याचेच समोर आले आहे.
नवीन रणनीतीवर काम
पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. आता हिंदुस्थान एका नवीन रणनीतीवर काम करत असल्याचे हिंदुस्थानी लष्कराने म्हटले आहे. जिथे दहशतवादी असतील तिथे हल्ला करून त्यांचे अड्डे नष्ट करू, असेही लष्कराने स्पष्ट केले आहे. हिंदुस्थानी लष्कराची स्वदेशी बनावटीची शस्त्रs पाकिस्तानविरोधात अत्यंत प्रभावी असून आकाशतीर संरक्षण प्रणाली आणि एल-70 एअर डिफेन्स गनने पाकिस्तानचे प्रत्येक ड्रोन आणि क्षेपणास्त्र नष्ट केल्याचेही लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावल्याचे ते म्हणाले.
तृणमूलचे पथक जम्मू–कश्मीरमधील पीडित भागांना भेटी देणार
तृणमूल काँग्रेसचे पाच सदस्यांचे पथक जम्मू आणि कश्मीरमधील पाकिस्तानी गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या भागांना भेटी देणार आहे. त्यासाठी तीन दिवसांचा दौरा करण्यात येणार आहे. श्रीनगर, पूंछ आणि राजौरी येथील लोकांना भेटणार आहेत. पथकात खासदार डेरेक ओ’ब्रायन, सागरिका घोष, मोहम्मद हक, मंत्री मानस भुईया आणि खासदार ममता ठाकूर यांचा समावेश आहे.
पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर फील्ड मार्शल
पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांना फील्ड मार्शल या सैन्यातील सर्वोच्च पदावर बढती देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील ते दुसरे फील्ड मार्शल ठरले आहेत. यापूर्वी अयूब खान 1959-1967 दरम्यान या पदावर होते. हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने सैन्याची ताकद वाढवण्यासाठी मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती दिली आहे.