पर्यावरणाचे जतन, संवर्धन करणाऱ्या शहरे, गावांचा होणार पर्यावरणदिनी सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्ग वादळ, ढगफुटीसारखी संकटे वाढली आहेत. किंबहुना कोरोनासारखी संकटे हेसुद्धा वातावरणातील बदलाचाच परिणाम असल्याचे दिसते. हे रोखण्यासाठी पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याला पर्याय नाही. या कामात लोकांचा सहभाग आवश्यक असून पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणाऱया 3 शहरे, 3 महापालिका, 3 नगरपंचायती, 3 ग्रामपंचायती व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओंचा 5 जून या जागतिक पर्यावरणदिनी पुरस्काराने सन्मान करण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केली. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज 395 शहरे, 339 ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱया ‘माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंत्रालयातून अभियानाचा ई-शुभारंभ केला. 31 मार्चपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, आपल्याला पुढच्या पिढीला चांगली पृथ्वी द्यायची असेल तर निसर्गाशी संबंधीत पंचतत्वांबरोबर आपण कसे जगू याचा विचार करावा लागेल. वातावरणाचा पॅटर्न बदलत आहे. अशावेळी इलेक्ट्रिक बसेस, इलेक्ट्रिक रिक्षांचा वापर, अपारंपारिक उर्जा स्रोतांचा वापर, कार्यालयांमध्ये उर्जा, पाणी यांच्या वापराचे लेखापरिक्षण करणे, कार्बन फुटप्रींटस् कमी करणे अशा अनेक उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील. माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या या चळवळीला गती देण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर हे कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आदी ऑनलाईन सहभागी झाले होते.

असे असणार अभियान
अभियानात निसर्गाशी संबंधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत केली जाणारी कामगिरी आणि राबविले जाणारे विविध उपक्रम यांच्या आधारे गुणांकन केले जाणार आहे. एकुण 1500 गुणांच्या आधारे सर्वेत्कृष्ट कामगिरी करणारे शहरे, गावे यांची निवड केली जाणार आहे.