वेब न्यूज – इक्विफॅक्स हॅक प्रकरणात चायनीज सैन्याधिकारी संशयित?

304

मार्च 2017 च्या इक्विफॅक्स डेटा हॅक केल्याच्या गुह्यात संशयावरून अमेरिकेच्या न्याय विभागाने चीनच्या लष्कराच्या चार सदस्यांविरुद्ध आरोप दाखल केले आहेत. या इक्विफॅक्स हॅक प्रकरणात सुमारे 145 दशलक्ष अमेरिकन लोकांवर थेट परिणाम झाला. त्यांच्या सामाजिक सुरक्षा क्रमांकासह ग्राहकांबद्दल असलेली अत्यंत संवेदनशील माहिती लीक झाली. एफबीआय आता या चार संशयित पुरुषांसंबंधी अधिक माहितीच्या शोधात आहे. इक्विफॅक्स डाटा हॅक प्रकरण हे अमेरिकेच्या निम्म्या लोकसंख्येला धक्का देऊन गेले. या लोकांचे सामाजिक सुरक्षा क्रमांक, जन्म तारीख, पत्ते, वाहन चालक परवाना क्रमांक अशी अत्यंत संवेदनशील वैयक्तिक माहिती उघड झाली होती. अमेरिकेच्या अटलांटा येथील जिल्हा कोर्टात अमेरिकन न्याय विभागातर्फे वू झियॉंग, वांग किआन, झू के आणि चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) लियू लेई यांच्यावर व्यापारातील रहस्ये चोरण्यासाठी आणि इक्विफॅक्सच्या संगणक प्रणालीमध्ये हॅक केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या चोरलेल्या डेटाचे आर्थिक मूल्य प्रचंड असून ही डाटाची चोरी कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या चीनच्या विकासाला पोषक ठरू शकते असे ऍटर्नी जनरल विल्यम पी. बार यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

या अभियोगानुसार, या चार चिनी नागरिकांवर Computer Fraud, Economic Espionage, Wire Fraud, Conspiracy to Commit Computer Fraud, Conspiracy to  Commit Economic Espionage आणि Conspiracy to Commit Wire Fraud असे विविध आरोप लवण्यात आले आहेत. तपासात असे आढळून आले आहे की, या हॅकर्सनी तब्बल नऊ हजारवेळा इक्विफॅक्सच्या सिस्टीमवर क्वेरीज टाकल्या. एकदा का त्यांना त्यांच्या फायद्याची फाईल सापडली की, त्यातील माहिती ते ताबडतोब टेंपररी आऊटपुट फायलीमध्ये साठवून ठेवत असत आणि ती compress करून वेगवेगळी साठवण्यात येई. त्यानंतर इक्विफॅक्सच्या नेटवर्कवरील ही माहिती अमेरिकेबाहेरच्या संगणकांवर हस्तांतरित केली जाई.

आपली प्रतिक्रिया द्या