शौचालयात अडकलेल्या बिबट्याची सुटका; रात्रभर बिबट्यासोबत राहूनही कुत्रा सुरक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या चक्क शौचालयात शिरल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथे घडली आहे. सकाळी बिबट्याने अशोक तुकाराम कांबळे यांच्या घराजवळील कुत्र्यावर झडप घातली मात्र त्यातून हा कुत्रा निसटला आणि पळत थेट कांबळे यांच्या शौचालयात घुसला. कुत्र्या पाठोपाठ बिबट्या देखील शौचालयात घुसला मात्र त्याच वेळी शौचालयाचा दरवाजा बंद झाल्याने कुत्रा व बिबट्या आतमध्ये अडकले. वनखात्याने दुसऱ्या दिवशी त्यांची सुटका केली. विशेष म्हणजे रात्रभर बिबट्यासोबत एकत्र असूनही कुत्रा सुरक्षित आहे.

कांबळे यांनी सकाळी शौचालयाचा दरवाजा उघडला त्यावेळी बिबट्या आणि कुत्रा त्यांना आतमध्ये दिसले. त्यांनी त्वरीत दरवाजा पुन्हा बंद करून वन विभागाशी संपर्क केला. वन विभाग तातडीने पिंजरा घेऊन घटनास्थळी पोहचले व शौचालयाचा वरील भाग फळ्या ठोकून बंद केला आणि शौचालयाच्या तोंडावर पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद केले. चार वर्षांची ही बिबट्या मादी असून तिची वैद्यकीय तपासणी करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.