
भक्कम बचावाने गोलंदाजांना हैराण करणारा ‘द वॉल’ राहुल द्रविड आणि फिरकीच्या जादूने फलंदाजांना गुंगवणारा रविचंद्रन अश्विन आता नव्या मैदानात उतरायला सज्ज झाले आहेत. क्रिकेटपटू म्हणून लौकिक मिळवलेल्या या दोन दिग्गजांची नजर आता युरोपियन टी–20 प्रीमियर लीगवर आहे. या लीगमध्ये ग्लासगो आधारित फ्रेंचायझी खरेदी करण्यासाठी हिंदुस्थानी गुंतवणूकदारांच्या गटात द्रविड आणि अश्विन सहभागी झाले असून करारही अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
ग्लासगोवर हिंदुस्थानी मोर्चा
सहा संघांच्या या महत्त्वाकांक्षी स्पर्धेचे आयोजन यंदाच्या उन्हाळय़ात होणार आहे. या पार्श्वभूमीवर द्रविड-अश्विन यांच्या गटाने ग्लासगो फ्रेंचायझी ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट विश्वात प्रतिष्ठsची मानली जाणारी ही लीग आता युरोपमध्ये क्रिकेटचा नवा बाजार उघडण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, नेदरलँड्समधील रॉटरडॅम फ्रेंचायझी दक्षिण आफ्रिकेच्या गुंतवणूकदारांकडे जाण्याची शक्यता आहे. या गटात फाफ डू प्लेसिस, हेनरिक क्लासेन आणि जॉण्टी ऱहोड्स यांसारखी मोठी नावे आहेत.
अश्विन मैदानात उतरणार का?
अश्विन या लीगमध्ये प्रत्यक्ष खेळणार का, याबाबत अजूनही उत्सुकता आहे. सध्या तो जगभरातील फ्रेंचायझी लीगमध्ये खेळण्यास मोकळा असल्याने त्याचा सहभाग रंगत वाढवू शकतो.































































