मी पडले तरी कुणालाही कळणार नाही! ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींचे डोळे पाणावले

नुकताच अंकिता लोखंडेने युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि उषा नाडकर्णी या गप्पा मारताना दिसत आहेत. अंकिताने तिचा हा व्लॉग 2 जूनला युट्यूबवर शेअर केला. या व्लाॅगमध्ये उषाताईंनी सांगितलं की, 79 वर्षांच्या वयातही त्या मुंबईसारख्या महानगरात एकट्या राहतात. उषाताईंना हे वाक्य बोलतानाच खूप गहिवरुन आलं होतं.

अंकिता लोखंडेची ओळख मराठी इंडस्ट्रीला तर आहेच. पण मराठीच्या जोडीने अंकिता हिंदी इंडस्ट्रीमध्येही लोकप्रिय आहे. अंकिताला नुकतेच 16 वर्षे या क्षेत्रात झालेली आहे. सध्याच्या घडीला अंकिता लाफ्टर शेफमध्ये स्पर्धक आहे. तिच्यासोबतच तिचा पती विकी जैनही लाफ्टर शेफमध्ये पाहायला मिळतोय. अंकिता तिच्या युट्युब चॅनलसाठी सतत काही ना काही व्लाॅग बनवत असते. 2 जूनच्या व्लाॅगमध्ये अंकिता पवित्र रिश्ताच्या गेटअपमध्ये दिसून आली होती. या वेळी तिच्यासोबत तिच्या पवित्र रिश्ता या मालिकेमधील सासू उषा नाडकर्णी यादेखील आहेत.

अंकिताची टीव्ही इंडस्ट्रीमधील कामाचा श्रीगणेशा हा 2009 मध्ये आलेल्या पवित्र रिश्ता या मालिकेतून झाला होता. यामध्ये सुशांत सिंह राजपूत होता. अंकिता आणि उषाताई एकत्र भेटल्यानंतर, पवित्र रिश्ताच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी अंकिता आणि उषाताई या दोघींनी मिळुन सुशांत सिंह राजपूतसोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला. अंकिता आणि उषाताई या दोघींमध्ये खूप गप्पा रंगल्या. परंतु या गप्पांमध्ये एक क्षण असा आला की, उषाताईंचा आवाज कातर झाला, आणि त्यांचे डोळेही पाणावले. व्हिडीओमध्ये उषाताईंनी सांगितलं की, 79 वयात सध्याच्या घडीला त्या मुंबईसारख्या शहरात एकट्याने राहत आहेत. हे वाक्य बोलताक्षणी उषाताई गहिवरल्या होत्या.

व्लॉगमध्ये बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या की, “मी घरी एकटीच असते, मला भीती वाटते की, मी पडले तरी, कोणालाही कळणार नाही. गेल्या वर्षी 30 जून रोजी माझ्या भावाचं निधन झालं. जर त्याला माहीत असतं की, मी कोणत्या संकटात आहे, तर तो माझ्याकडे धावत आला असता. आता, मी कोणाला सांगू?”

यावेळी अंकिताने बोलताना, सुशांत सिंह राजपूत बरोबरच्या आठवणींनाही उजाळा दिला. “सुशांत खूप चांगला अभिनेता होता. तो मला खूप मदत करायचा कारण जेव्हा मी सर्व कलाकारांसमोर जायचे, तेव्हा मला इतके मोठे सीन कसे करायचे? याबद्दल खूप भीती वाटायची. तेव्हा त्याने मला खूप मार्गदर्शन केलेले आहे. अंकिताने तिच्या मुंबईतील घरी एका भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये पवित्र रिश्ता या मालिकेतील, तिच्या सासुबाई सविता देशमुखांची भूमिका साकारणाऱ्या उषा नाडकर्णी यांना आमंत्रित केलेले होते.