#Article370 वादग्रस्त विधान करणारे माजी आयएएस फैजल ताब्यात, देश सोडण्यास मज्जाव

1510

कलम 370 रद्द केल्यानंतर वादग्रस्त विधान करणारे माजी आयएएस अधिकारी आणि ‘जम्मू आणि काश्मीर पिपल्स मुवमेंट’ पक्षाचे प्रमुख शाह फैजल यांना देशाबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. फैजल यांना नवी दिल्ली विमानतळावर रोखण्यात आले आहे. नागरी सुरक्षा कायद्यांतर्गत फैजल यांना ताब्यात घेण्यात आले असून तिथून त्यांना श्रीनगरला पुन्हा माघारी धाडण्यात आले आहे.

#Article370 ‘सर्व काही गमावलंय, आता लढाई सुरू ठेवण्याशिवाय पर्याय नाही!’

याआधी जम्मू-कश्मीर राज्याला विशेष अधिकार देणारे कलम 370 हद्दपार केल्यानंतर शाह फैजल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर टीका केली असून जम्मू कश्मीरमधील लोक सर्व काही गमावून बसले असून आता लढाई सुरू ठेवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही असे फैजल यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते.

कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयामुळे स्थानिक लोकांना मोठा धक्का बसला आहे. याचा काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. हिंदुस्थानने येथील लोकांचा विश्वासघात केल्याचे लोक बोलत असल्याचे फैजल आपल्या पोस्टमध्ये म्हणतात. कलम 370 रद्द केल्यानंतर अनेक नेत्यांना अटक झालेली आहे, तर काहींना अटक झालेली नाही. अटक न झालेले नेते स्थानिकांना शांततेची विनंती करत आहे. परंतु या निर्णयानंतर उसळणाऱ्या हिंसाचाराच आठ ते दहा हजार लोकांचा मृत्यू होईल आणि सरकार त्यासाठी तयार असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. परंतु कोणाला नरसंहाराची संधी न देता याचा प्रतिकार करण्यासाठी आम्हाला जिवंत राहायला हवे, असेही फैजल यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या