#Article370 ‘सर्व काही गमावलंय, आता लढाई सुरू ठेवण्याशिवाय पर्याय नाही!’

253

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीर राज्याला विशेष अधिकार देणारे कलम 370 हद्दपार केल्यानंतर माजी आयएएस अधिकारी आणि ‘जम्मू आणि काश्मीर पिपल्स मुवमेंट’ पक्षाचे प्रमुख शाह फैजल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर टीका केली असून जम्मू काश्मीरमधील लोक सर्व काही गमावून बसले असून आता लढाई सुरू ठेवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही असे फैलज यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

फैजल यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयामुळे स्थानिक लोकांना मोठा धक्का बसला आहे. याचा काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. आम्ही काय गमावले आहे याची आम्हाला जाण असून दु:ख आहे. अनेकांनी यामुळे राज्याचे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली आहे. हिंदुस्थानने येथील लोकांचा विश्वासघात केल्याचे लोक बोलत असल्याचे फैजल आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.

कलम 370 रद्द केल्यानंतर अनेक नेत्यांना अटक झालेली आहे, तर काहींना अटक झालेली नाही. अटक न झालेले नेते स्थानिकांना शांततेची विनंत करत आहे. परंतु या निर्णयानंतर उसळणाऱ्या हिंसाचाराच आठ ते दहा हजार लोकांचा मृत्यू होईल आणि सरकार त्यासाठी तयार असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. परंतु कोणाला नरसंहाराची संधी न देता याचा प्रतिकार करण्यासाठी आम्हाला जिवंत राहायला हवे, असेही फैजल यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. कश्मीरमधील लोक सध्या शांत आहेत ही जमेची बाब असल्याचेही ते म्हणाले. तसेच दोन केंद्रशासित प्रदेश करून सरकार आमची ओळख, आमचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या