माजी सैनिकाला मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमच्या कामगारास दमदाटी का करतो असा जाबा विचारत माजी सैनिक मधुकर मच्छिंद्र काशीद (वय 49, रा तपनेश्वर, मिलिंद नगर) यांना गजाने व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी नगरसेविकेचे पती मोहन पवार यांच्यासह एकुण सात जणांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी सैनिक काशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून नगरसेविकेचे पती मोहन सिताराम पवार, पंडित सिताराम पवार, अविनाश दत्तात्रय साठे, सुरज पवार, बबलू , सनी, अर्थराज या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री सातजण तक्रारदाराला म्हणाले की, तू आमच्या दुकानासमोर येऊन आमचे कारागीर अविनाश साठे यास दमदाटी का करतोस अशी विचारणा करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर तक्रारदार घरी गेल्यानंतर त्या जणांनी त्यांच्या घरी जाऊन काशीद यांना घराबाहेर बोलवले. त्यांना शिवीगाळ व दमदाटी करत लोखंडी गजाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. या घटनेत काशीद जखमी झाले आहेत. हे भांडण सोडवण्यासाठी काशीद यांची पत्नी मध्ये पडली असता त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. यावेळी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची चैन व मनीगंठण गहाळ झाले. या मारहाण प्रकरणी सात जणांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब गव्हाणे करत आहेत.