बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाचा दिलासा, वर्षभर अभ्यास केलेल्या विषयांचीच परीक्षा

यंदाच्या बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱया विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. फक्त या वर्षासाठीच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून वगळलेल्या विषयांची परीक्षा देण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली आहे.

यंदाच्या वर्षापासून बारावीसाठी सुधारित विषय आणि मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे. यानुसार शाखानिहाय गट ए, बी, सीमध्ये विषयांची विभागणी करण्यात आली असून काही विषय अभ्यासक्रमातून रद्द केले आहेत. 8 ऑगस्ट 2019 रोजी या विषयीचा अध्यादेश जारी करण्यात आला, मात्र ज्युनियर का@लेज आणि शिक्षकांचे या अध्यादेशाकडे दुर्लक्ष झाले. त्यांनी जुन्याच विषय योजनेनुसार विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू ठेवला. परिणामी जे विषय अभ्यासक्रमातून वगळले आहेत त्या विषयांची विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेच्या दृष्टीने तयारी केली. बारावी परीक्षेचे अर्ज भरते वेळी ही बाब समोर आली. कारण जे विषय वगळण्यात आले होते ते विषय परीक्षा अर्जातूनही गायब होते. या गोंधळानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी विषय कसे निवडायचे? निवडलेल्या नवीन विषयांचा एक-दोन महिन्यांत अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित झाला होता, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना फक्त यंदाच्या वर्षापुरती जुन्या विषयांची परीक्षा देण्याची मान्यता दिली आहे.

परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या

बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 18 जानेवारीला संपली आहे. जुन्या विषयांची परीक्षा देण्यास परवानगी मिळेल या आशेवर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा अर्जच भरलेले नाहीत. आता शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाचणार असून त्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे प्रा. मुपुंद आंधळकर यांनी केली आहे.

जुन्या विषयांचे अध्यापन तातडीने थांबवा

जुन्या विषयांनुसार परीक्षा देण्याची सवलत केवळ यंदाच्या परीक्षेपुरती असून वर्ष 2021-22 पासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार नाही. कॉलेजनेही बंद झालेल्या विषयांचे किंवा शाखेसाठी उपलब्ध नसलेल्या विषयांचे अध्यापन तातडीने बंद करावे अशा सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत. तसेच जुन्या विषयांची परीक्षा देणारे जे विद्यार्थी त्या विषयात किंवा अन्य विषयांत नापास होतील त्यांना पुन्हा तोच विषय घेऊन फेरपरीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

सुधारित विषय निश्चिती योजना

  • अवेस्ता-पहलवी, सामान्यज्ञान, हिंदी उपयोजित, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, स्टेनोग्राफी (इंग्रजी/मराठी).
  • ग्रुप सीमध्ये समावेश झालेला शिक्षणशास्त्र हा विषय यापुढे केवळ कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध.
  • समाजशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, सहकार, राज्यशास्त्र हे विषय ग्रुप सीमध्ये समाविष्ट झाले असून यापुढे यांपैकी कोणत्याही एका विषयाची निवड करता येणार.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही

  • अवेस्ता-पहलवी, सामान्यज्ञान, हिंदी उपयोजित, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, स्टेनोग्राफी (इंग्रजी/मराठी) या विषयांचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार.
  • विज्ञान शाखेच्या ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षणशास्त्र विषय घेतला आहे त्यांनाही परीक्षा देण्याची मुभा.
  • समाजशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, सहकार, राज्यशास्त्र यांपैकी एकापेक्षा अधिक विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांनाही यंदा परीक्षेची संधी.
आपली प्रतिक्रिया द्या