कोरोनामुळे परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांची 6 जुलैपासून पुन्हा परीक्षा; ‘आयडॉल’च्या विद्यार्थ्यांना युवा सेनेमुळे मिळाला न्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागातील (आयडॉल) अनेक विद्यार्थी कोरोना संकटामुळे परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने त्यांचे प्रवेश रद्द केले होते. या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देण्याची तयारी दर्शवूनही विद्यापीठाने प्रतिसाद दिला नव्हता. अखेर युवा सेनेच्या हस्तक्षेपामुळे विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची 6 जुलैपासून पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

2019-20 या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे ‘आयडॉल’ला एफवायबीकॉमची परीक्षा घेता आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट एसवायबीकॉमला प्रवेश देण्यात आला आणि नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांची परीक्षा घेण्यात आली. परंतु कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आपल्या मूळगावी किंवा इतर सुरक्षित ठिकाणी गेलेल्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला बसता आले नव्हते. त्यांनी पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी केली; परंतु पुन्हा परीक्षा घेण्यात आली तेव्हा ‘तौकते’ चक्रीवादळामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांची ती संधीही हुकली. विद्यार्थ्यांनी पुन्हा विद्यापीठाशी संपर्क साधला असता विद्यापीठाने पुन्हा परीक्षा घेण्याबाबत मौन धारण केले.

शैक्षणिक वर्षाचे नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या सूचनेनुसार युवा सेना सहसचिव संतोष धोत्रे व मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. धनराज कोहचाडे यांनी ‘आयडॉल’चे संचालक डॉ. महानवर यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार विद्यापीठाने परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला असे युवा सेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.