परीक्षांचा मौसम

फोटो प्रातिनिधिक

>> प्रा. भूषण देशमुख, [email protected]

येत्या मंगळवारी बारावीची परीक्षा. हळूहळू परीक्षांचे दिवस सुरू होत आहेत. काहीजण शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करतात तर काहीजण फक्त अभ्यासाचा आनंद घेतात, परीक्षेचा ताण नाही. कसे असावेत परीक्षेची चाहूल देणारे दिवस…

बारावीची परीक्षा दोन दिवसांवर आली आहे. परीक्षांचा मोसम आता उंबऱ्यात येऊन ठाकला आहे. परीक्षेचं दडपण आलंय? अजिबात घाबरू नका… इतर परीक्षांसारखीच तुमची ही परीक्षा आहे. तुमचा अभ्यास झालाय… फक्त सरावाकडे लक्ष द्या. योग्य आहार, पुरेशी झोप घ्या. ही वेळ ताणतणाव घेण्याची नाहीए…

परीक्षेला जाताना

अभ्यासाची उजळणी करणे. एकच वेळापत्रक ठेवायचं. ते बदलायचं नाही. वेगवेगळं वेळापत्रक केलं तर त्याचा परीक्षेवर परिणाम होतो. त्यामुळे आहे तेच वेळापत्रक पाळायचं. जागरण करण्यापेक्षा सरावाला भरपूर वेळ द्या. मार्कांचं प्रेशर घेऊ नका. अभ्यासात जास्तीत जास्त अचूकता आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा अभ्यासात जास्त उपयोग होतो.

परीक्षेचा आदला दिवस, आदली रात्र कशी असावी?

खरं तर परीक्षेचा दिवस हा नॉर्मल दिवसच समजायचा. आतापर्यंत जे काही आपण केलं आहे त्याची नीट उजळणी करायची. हे मनात आणाल तर फारसं वेगळं वाटणार नाही. परीक्षेचं फारसं टेन्शन घ्यायचं नाही. हा एक नॉर्मल दिवसच आहे. आपण सराव परीक्षा देतो तशीच ही परीक्षा समजायची. परीक्षेचं वेळापत्रक नेहमीप्रमाणेच समजायचं. खूपजण शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करत असतात. खरं तर अशा वेळी मानसिकता स्थीर असणं गरजेचं असतं. त्यासाठी आता योग, मेडिटेशन उत्तम पर्याय आहे, पण आता तेवढा वेळ नसतो हे खरं. मात्र चांगली उजळणी केली असेल तर अभ्यास कायमस्वरूपी लक्षात राहतो. आपण सराव किती करतो याला महत्त्व आहे. सरावाच्या दरम्यान परीक्षेची वेळ आहे त्याच वेळेत पेपर लिहून बघायचा. वेळेत पेपर लिहिण्याचा सराव खूप महत्त्वाचा आहे. प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशीही आपण रोज करतोय तसंच वाटतं. पालकांनीही मुलांसमोर परीक्षेचा बाऊ करू नये. परीक्षा हा जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. त्या जीवनात चालूच राहणार, पण मुलांसमोर परीक्षेचा बाऊ केला तर मुलं डिस्टर्ब होतात.

अभ्यासावर अखेरचा हात

नीट वेळापत्रक बनवून आठवडय़ासाठी शेवटच्या आठवडय़ात प्रत्येक विषयासाठी एकेक दिवस दिला तर मग बऱ्यापैकी अभ्यास होऊन जातो. परीक्षेच्या काळात अभ्यासाबरोबर आहारही तितकाच आवश्यक असतो. सात्त्विक आहार हा आरोग्यासाठी केव्हाही महत्त्वाचाच असतो. नाश्ता चांगला करायचा. तो हलकाफुलका असायला हवा. शारीरिक फिटनेस आणि एकाग्रतेचा संबंध आहे. एकाग्रता चांगली राहिली तर बरंच काही साध्य करता येतं. परीक्षेचा ताण घेऊन अनेकजण आजारी पडतात. त्याचा परिणाम परीक्षेवर होतो. म्हणून अभ्यासाबरोबर आहारही तितकाच आवश्यक आहे.

दैनंदिनी कशी असावी?

परीक्षेच्या किमान एक तास आधी सेंटरवर पोहोचणे आवश्यक आहे. परीक्षा संपल्यावर लगेच घरी निघून या. पेपर कसा गेला यावर चर्चा करत बसू नका. कारण त्याचा परिणाम पुढच्या पेपरवर होतो. गेलेल्या पेपरवर चर्चा करण्यापेक्षा घरी येऊन एक तास विश्रांती घेतली तर फायदाच होईल. त्यानंतर अभ्यासाला बसायला हरकत नाही. आठ ते दहा तास अभ्यास करण्यापेक्षा अभ्यासाचे नियोजन करून 8 ते 10 ही वेळ निवडायची. उगाच घोकंपट्टी करण्यापेक्षा फक्त दोन तास अभ्यास करा, पण तो मनापासून करा.

पुरेशी झोप हवीच

झोपेचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे परीक्षेच्या काळातही विद्यार्थ्यांनी किमान सात ते आठ तास झोप घ्यायलाच हवी. झोपेमुळे थकलेले शरीर शांत होते. पुरेशी झोप झाली नाही तर त्याचा परिणाम मनावर आणि अभ्यासावरही होतो. परीक्षेच्या काळातही विशिष्ट प्रमाणात झोप घेणे महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळेच वर्षभराच्या अभ्यासाचं प्रतिबिंब परीक्षेत पडणार आहे.

अवघड विषय कसे हाताळावेत?

मुळात अवघड असं काहीही नसतं. एकाला एखादा विषय सोपा वाटतो, पण तोच विषय एखाद्याला कठीण वाटतो. अवघड म्हणजे काय तर त्या विषयात आपल्याला जास्त रस नसणे. सगळ्या विषयांचा आपल्याला फायदाच होणार आहे एवढं लक्षात घेतलं की झालं… अवघड विषयात थोडासा रस दाखवला तर तो विषय अवघड वाटत नाही. आवडत्या विषयाचा अभ्यास कितीही वेळ केला तरी वेळ गेला असं वाटत नाही. अवघड गोष्टींना विद्यार्थी दूर ठेवतात. त्यामुळे त्या अवघड वाटतात. म्हणून अवघड वाटणारे विषय आधी हातात घ्या. बघा या अवघड गोष्टी कशा सोप्या होतात… अवघड विषयात मनापासून रस घेतलात तर ते नक्की सोपे वाटू लागतील.

पालकांची अतिकाळजी

पालकांनी मुलांची अतिकाळजी करू नये. प्रत्येक विद्यार्थ्याची एक विशिष्ट कुवत असते. त्यापलीकडे ते जाऊच शकत नाहीत. प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षमतेनुसार अभ्यास करतच असतो. यामुळे त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून फक्त त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांना तुमच्या आधाराची, प्रोत्साहनाची आवश्यकता असते.

कोणते प्रश्न आधी सोडवावेत?

जे प्रश्न आपल्याला स्कोरिंग वाटतात, ज्यांचा आपण योग्य सराव केलाय याची खात्री असते आणि जे प्रश्न वेगाने सुटतील ते आधी सोडवावेत. परीक्षा म्हटलं म्हणजे मनावर ताण येणं साहजिक आहे. त्यामुळे काही वेळ आपल्या आवडत्या गोष्टीतही घालवा. मन रमवा. मग ताज्या दमाने अभ्यासाला लागा.

काय कराल

  • घरातलं वातावरण हलकंफुलकं ठेवा.
  • परीक्षेच्या काळात सात्त्विक आहार घ्या.
  • सरावावर जास्त भर द्या.
  • सगळेच दिवस सारखे आहेत असे समजा. परीक्षेचा दिवस  काही वेगळा समजू नये.
  • नेहमीप्रमाणेच चोख परफॉर्मन्स द्यायचाय हेच स्वतःला वारंवार बजावा.
  • अभ्यासादरम्यान विरंगुळ्याकडेही लक्ष द्या.
  • तासन्तास फक्त अभ्यास एके अभ्यासच करू नका.
  • क्वाँटिटीपेक्षा क्वाँलिटी अभ्यासाला महत्त्व द्य
  • स्वतःच्या नोटस् आपण स्वतःच काढायच्या. त्यासाठी दुसऱ्यावर विसंबून राहू नका.

परीक्षेपेक्षा विषयावर प्रेम केलं…

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे परीक्षेचा अभ्यास  कधीच केलेला नाही. त्यावेळेला सोलापूरमध्ये आतासारखे क्लासेस वगैरे प्रकार नव्हते. पुण्या-मुंबईत कसे गल्लोगल्ली क्लासेस झालेत तसे सोलापूरमध्ये तेव्हा नव्हते. शिक्षण घेतले, पण क्लासला गेलो नाही. दहावीला असताना त्र्यं.वि.सरदेशमुखांकडे चार्ल्स डिकन्स यांचे ‘अ टेल ऑफ टू सिटिज’ शिकायला जायचो, पण ते काही अभ्यासासाठी वगैरे नाही तर केवळ चांगलं साहित्य म्हणजे काय आणि इंग्रजी सुधारलं पाहिजे या दोन कारणांसाठी मी तिथे जात होतो. कुठलीही गोष्ट मी परीक्षेसाठी केलीच नाही. मी दहावीत असताना आठवीतली गणितं, सातवीत असताना नववीतली गणित सोडवत असे. परीक्षेपेक्षा मी विषयावर जास्त प्रेम करायचो.

अच्युत गोडबोले

शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास

खरं तर परीक्षेच्या आधीचा अभ्यासच खरा अभ्यास असतो आणि तो तेव्हाच चिकाटीने करायचा असतो. इतर दिवसांत तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटीजना वेळ देऊ शकता. पण परीक्षेच्या आधीचा पंधरा दिवसांचा वेळ मला वाटतं फक्त अभ्यासाचा असतो. मी तरी तेव्हाच अभ्यास करायचे. माझा तर अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास असायचा. हॉलमध्ये जाईपर्यंत, वर्गात सुपरवायझर येईपर्यंत माझं पुस्तक उघडं असायचं. आता मी इंजिनीयरिंग करते आणि मला अस वाटतं इंजिनीयरिंगच्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत हे होत असतं. पूर्ण सेमिस्टर काहीच अभ्यास होत नाही, पण आदल्या दिवशी लेट नाइट स्टडी होतो तोच खरा अभ्यास असतो. दहावीपर्यंत मला सायन्स हा विषय अवघड वाटायचा. त्याची प्रॅक्टिकल्स आवडायची, पण थिअरी समजायचीच नाही. पण नंतर तोच विषय आवडीचा झाला. दहावीला 92 टक्के गुण होते. दहावीत सायन्सची थिअरी लक्षात राहायची नाही म्हणून काही ट्रीक करून मी त्या गोष्टी लक्षात ठेवायचे. वक्तृत्व स्पर्धेत मी खूप भाग घ्यायचे. त्याच पद्धतीने सायन्सचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. त्याचा अभ्यास मी दररोज थोडा थोडा करायचे. अभ्यास पूर्ण व्हायचा तेव्हा मी डान्स करायचे. रिलॅक्सेशनसाठी डान्स करायचे. सकाळी योगा किंवा फिटनेस वर्कआऊट करायचे. जेणेकरून अभ्यास करताना मनावर ताण येणार नाही. त्यामुळे फिटनेस माझ्यासाठी रिलॅक्सेशन पॉइंट आहे.

प्राजक्ता गायकवाड

आपली प्रतिक्रिया द्या