
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत यंदा शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळाने कडक धोरण आखले आहे. परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या दिवशी विषय शिक्षकांना बंदी घालण्यात आली आहे.
गतवर्षी कोरोनामुळे राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देऊन निकाल जाहीर केला. यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्यात आले आहेत. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना 14 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून, दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा आज शुकवार, 25 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. बारावीची लेखी परीक्षा ही 4 ते 30 मार्चदरम्यान, दहावीची लेखी परीक्षा 15 ते 4 एप्रिल या दरम्यान होणार आहे. या परीक्षांची तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे.
यंदा शाळा तिथे परीक्षा केंद्र दिल्याने पूर्वी केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना मुख्य परीक्षा केंद्र तर नव्याने केंद्र दिलेल्या शाळा, महाविद्यालयांना उपकेंद्र असे संबोधण्यात येणार आहे. मुख्य तसेच उपकेंद्राचे कामकाज पाहणारे केंद्र संचालक हे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य हेच राहणार आहेत. 15 पेक्षा कमी आवेदनपत्र भरलेल्या शाळा या मुख्य केंद्रास जोडण्यात आलेल्या आहेत. परीरक्षक कार्यालयातून मुख्य परीक्षा केंद्रास प्रश्नत्रिका व उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठी सहायक परीरक्षक राहतील. मुख्य केंद्राकडून उपकेंद्राकडे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठी संबंधित उपकेंद्राचे शिक्षक (रनर) राहणार आहेत.
दरम्यान, परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी ज्या विषयांचा पेपर असेल त्या विषयांच्या शिक्षकांना शाळा, परीक्षा केंद्रांवर बंदी घालण्याचा निर्णय शिक्षक मंडळाने घेतला आहे. त्या दिवशी संबंधित शिक्षकांना परीक्षेचे काम देऊ नये, अशा स्पष्ट सूचना मुख्याध्यापकांना मंडळाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
























































