विठ्ठल मंदिराला आता स्वतंत्र कार्यकारी अधिकारी; विठ्ठल जोशी यांची नियुक्ती

705

पंढरपूरातील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे नवीन स्वतंत्र कार्यकारी अधिकारी म्हणून वर्धा येथील उपजिल्हाधिकारी विठ्ठल जोशी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांची सेवा न्याय व विधी विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. यापूर्वीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले हे आता पंढरपूरचे प्रातांधिकारी म्हणून काम पाहतील. त्यांच्याकडील मंदिराचा अतिरिक्त कारभार जोशी यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विठ्ठल मंदिराचा कारभार पाहण्यासाठी न्याय व विधी खात्याने स्वतंत्र अधिकारी द्यावा, अशी नेहमीच मागणी होत होती. मात्र, अधिकार्‍यांची संख्या पाहता हे शक्य होत नव्हते. यासाठी येथील उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे हा अतिरिक्त कारभार सोपविला जात होता. सध्या काम पाहणारे सचिन ढोले यांची कारकिर्द विकासात्मक कामांमुळे खूपच गाजली. त्यांच्याकडेच प्रांताधिकारी पदाची जबाबदारी असल्याने राबविण्यात येणार्‍या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे व मंदिर समितीचे उपक्रम यांची त्यांनी चांगली सांगड घातली होती. मंदिरात अनेक नवनवीन योजना व उपक्रम त्यांनी राबविल्याने पंढरीत व वारकरी संप्रदायात त्यांचे कौतुक होत होते. परंतु त्यांच्याकडे महसूलचाही कारभार असल्याने एकाच वेळी दोन्हीकडे वेळ देताना कसरत होत असल्याने मंदिराला स्वतंत्र कार्यकारी अधिकारी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जोशी हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई येथील आहेत. येत्या दोन दिवसात ते मंदिराचा पदभार घेणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या