
पावसाळय़ात दूषित पाणी, दमट हवा यामुळे साथीचे आजार सहज पसरतात. तशीच एक डोळे येण्याची साथ सध्या सर्वत्र दिसत आहे. आयुर्वेदात याबद्दल अतिशय नेमके आणि विस्तृत विवेचन केलेले आहे, त्याबद्दल आज आपण माहिती घेऊ.
आयुर्वेदात नेत्राभिष्यंद नावाने एक रोग उल्लेखित आहे. अभिष्यंद म्हणजे सूज येऊन एखाद्या भागातील रक्तपुरवठा होण्यात अडथळा निर्माण होणे. हे जेव्हा नेत्र म्हणजे डोळय़ाच्या ठिकाणी होते तेव्हा त्याला नेत्राभिष्यंद म्हटले जाते. आता या आलेल्या सुजेत वात, पित्त, कफ यापैकी कशाचा जोर जास्त आहे ते पाहून याचे प्रकार आयुर्वेदात ठरवले जातात. जसे सामान्यतः सूज, डोळय़ात पांढरी घाण/कचरा जास्त येणे, घट्ट स्राव जास्त होणे ही कफाची लक्षणे असतात.
डोळे लाल होणे, जळजळणे, पिवळी घाण/कचरा येणे, पातळ स्राव जास्त होणे ही पित्ताची लक्षणे असतात. डोळे दुखणे, चुरचुरणे, खुपणे, कोरडेपणा, टोचणे असे सर्व त्रास ही वाताची लक्षणे आहेत.
आता वात, पित्त, कफ यांचे एकेरी किंवा वात, पित्त, कफ आणि पित्त, कफ असे दुहेरी किंवा तीनही दोषांचे एकत्रित असे एकूण सात प्रकार आयुर्वेदात केले जातात. आणि हे प्रकार ठरवून म्हणजे आयुर्वेदाने निदान करून त्याप्रमाणे त्याची चिकित्सा योजना केली जाते.
यामध्ये इन्फेक्शन, व्हायरस वगैरे प्रश्न लोकांना पडतील, परंतु त्यासाठी एकच सामान्य उत्तर देता येते. बाहेरून कितीही आक्रमणे झाली तरी आपल्या अवयवांची प्रतिकार क्षमता उत्तम असेल तर त्रास आपोआप कमी होतात आणि आटोक्यात राहतात.
काय काळजी घ्यावी…
डोळे आलेल्या व्यक्तीने पहिले दोन-तीन दिवस स्वतःला वेगळे ठेवावे. डोळे हाताने चोळू नयेत. रुमालाने स्वच्छ करावेत.
सकाळी उठल्यावर डोळे चिकटलेले असतील, दिवसभर पांढरी पिवळी घट्ट घाण डोळय़ात येत असेल तर डोळे कोमट पाण्याने किंवा कोमट त्रिफळा काढय़ाने स्वच्छ करावेत.
दिवसातून तीन वेळ डोळे हे त्रिफळाच्या काढय़ाने धुवावेत किंवा पुसावेत. त्रिफळा काढा कसा बनवावा तर एक चमचा ताजे त्रिफळा चूर्ण आणि चार कप पाणी एकत्र उकळावे आणि एक कप शिल्लक ठेवावे. त्यानंतर ते जमल्यास ब्लोटिंग पेपरवरून गाळून घ्यावे. ब्लोटींग पेपर नसेल तर आठ पदरी किंवा सोळा पदरी सुती कापडावरून गाळून घ्यावे. हा त्रिफळा काढा डोळे धुण्यासाठी रोज ताजा बनवून वापरावा. याने सुरुवातीला डोळे थोडे चुरचुरतात, पण डोळे येण्याचा जोर अतिशय चांगल्या प्रकारे आटोक्यात येतो. त्रिफळा हे वात, पित्त आणि कफ या तीनहीचे सामान्य औषध आहे आणि डोळय़ांना अतिशय लाभदायकही आहे. अनेक प्रकारची बाह्य करणे जसे इंफेक्शन्स याच्या संपर्काने कमी होतात.
डोळय़ांची जळजळ, टोचणे जास्त होत असेल तर औषधी गुलाब जल 5-5 थेंब दिवसातून तीन-चार वेळ डोळय़ात सोडावे.
सर्व प्रकारच्या डोळे येण्याच्या प्रकारात ताजा कांदा रस आणि मध सम प्रमाणात एकत्र करून 2-3 थेंब दोन्ही डोळय़ात रोज एक वेळ सकाळी उठल्यावर सोडावा. याने डोळय़ांची सफाई आणि स्वस्थ्यारक्षण दोन्ही उत्तम होते. डोळे येण्याचा जोरही लवकर कमी होतो.
आहारात आंबट, खारट आणि तिखट गोष्टी खाणे टाळावे. त्याने डोळे येण्याचा जोर लवकर आटोक्यात येतो. आपापल्या वैद्यांकडून आपल्याला आलेले डोळय़ांचे योग्य निदान करून त्यावर नेमकी औषधे घ्यावीत.
भरपूर घट्ट घाण येत असेल तर डोळय़ात एक एक थेंब मध, काजळ लावतात तसा लावावा. रोज दोन तीन वेळ हे करता येते याने डोळे थोडे चुरचुरले तरी स्वच्छ होतात.
-वैद्य सत्यव्रत नानल
[email protected]



























































