26 कोटी फेसबुक युजर्सचा डेटा ऑनलाइन लीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेसबुक वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा आहे. तब्बल 26.7 कोटी फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा ऑनलाइन लीक झाल्याचा दावा ‘कम्पॅरीटेक’ या सायबर सिक्युरिटी फर्मने केला आहे. रिसर्चर बब डियाचेंको या संस्थेनेही याला दुजोरा दिला आहे. 26 कोटींहून अधिक फेसबुक युजर्सची आयडी, फोन नंबर आणि संपूर्ण नाव संबंधित लीक डेटाबेसमध्ये असल्याचे समोर आले आहे. ज्यांची नावे या डेटाबेसमध्ये आहेत त्यांना स्पॅम मेसेज किंवा फिशिंग स्कीम्सच्या माध्यमातून लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
क्रॅपिंग या बेकायदा प्रक्रियाच्या माध्यमातून फेसबुक यूजर्सची संवेदनशील माहिती गोळा करण्यात आली असावी. या प्रक्रियेत ऑटोमेटेड बॉट्स फेसबुक प्रोफाइल्समधून पब्लिक इन्फॉर्मेशन कॉपी करण्यात येते आणि एपीआयमधून संबंधित माहिती चोरी केली जाते. दरम्यान, फेसबुक युजर्सचा डेटा गेल्या आठवडय़ात एक ऑनलाइन हॅकर फोरमवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होता. या ऑनलाइन हॅकर फोरमचा संबंध एका गुन्हेगारी समूहाशी असल्याची माहिती समोर येत आहे.

फेसबुककडून तपास सुरू
संबंधित डेटा ऑनलाइन लीक झाल्यानतंर फेसबुककडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. डियाचेंकोने डिसेंबरमध्येच संबंधित डेटाबेसची माहिती मिळवली होती. त्यानंतर त्या संस्थेने आयपी ऍड्रेस मॅनेज करणाऱया इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला याबाबतची माहिती दिली होती. संबंधित डेटाबेसचा संबंध एखाद्या गुन्हेगारी संघटनेशी असल्याची शंका डियांचेकोला आली होती. त्यानतंर फेसबुकने आवश्यक ती खबरदारी घेतली. याबाबतचा तपास सुरू केल्याची माहिती फेसबुकच्या प्रवक्त्याने दिली आहे.

ज्या 26 कोटींहून अधिक फेसबुक युजर्सची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे त्यांची माहिती कुणीही पाहू शकतो. यात यूजर्सचे नाव, फोन नंबर आणि आयईडी यांचा समावेश आहे. दरम्यान, या माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी संबंधित डेटाबेससाठीचा ऍक्सेस हटवण्यात आला आहे. दोन आठवडय़ांपर्यंत फेसबुक युजर्सची माहिती उपलब्ध होती. कुठलाही पासवर्ड न वापरता ही माहिती पाहता येत होती. याआधी सप्टेंबरमध्ये 40 कोटींहून अधिक फेसबुक युजर्सचा डेटा ऑनलाइन लीक झाला होता.