एकटेपणाने घेरले, फेसबुक लाईव्ह करत ठाण्यात कारकुनाची आत्महत्या

1729

प्रचंड नैराश्य आणि एकटेपणाची भावना मन पोखरत असल्याने एका व्यक्तीने आत्महत्या केली. मंदार भोईर (वय-35) असं या व्यक्तीचं नाव असून ते ठाणे महापालिकेमध्ये कारकून म्हणून कामाला होते. मंदार यांनी सोमवारी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी भोईर यांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं.

भोईर यांनी रविवारी रात्री फेसबुकवर एक पोस्ट अपलोड केली होती. ही पोस्ट पाहिल्यानंतर भोईर यांच्या मित्रांनी आणि जवळच्या माणसांनी त्यांना फोन करून धीर दिला आणि वेडवाकडं पाऊल उचलू नकोस असं प्रेमाने समजावून सांगितलं. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास भोईर यांनी फेसबुक लाईव्हमधून व्यक्त व्हायला सुरुवात केली. आयुष्यात आलेला एकटेपणा , आपल्याला कोणीच समजून घेत नसल्याची खंत त्यांनी या लाईव्हमध्ये बोलून दाखवली. हे लाईव्ह पाहिल्यानंतर मंदारची समजूत घालण्यासाठी अनेकांनी फोन केले. मात्र त्यातला एकही फोन त्याने घेतला नाही. यामुळे काही जणांनी मंदारच्या भावाला हा प्रकार कळवला. मंदारचा भाऊ हा त्याच्यापासून जवळच राहात होता. मंदारचा भाऊ त्याच्या घरी गेला मात्र दरवाजा बंद होता. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने मंदारच्या भावाने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा तोडला आणि आतमध्ये शिरताच त्यांना मंदारचा मृतदेह दिसला.

मंदारची बायको आणि सहा वर्षांची मुलगी त्याच्यासोबत राहात नाही. आईवडिलांच्या मृत्यूनंतर मंदार घरात एकटाच राहात होता. त्याला आईच्या निधनानंतर ठाणे महापालिकेत नोकरी लागली होती, मात्र तो कामावरही नियमितपणे जात नव्हता. त्याला प्रचंड नैराश्य आलं होतं, असं त्याला ओळखणाऱ्यांनी सांगितले आहे. मंदारच्या डोक्यावर कर्ज होती आणि तो दारूही प्यायला लागला होता असंही पोलिसांना कळालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या