फेसबुक, व्हॉटस्ऍपही तुमच्या आधारला जोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्याने नवी गाडी घेतली तर त्याची माहिती सर्वात आधी फेसबुकवर मिळते. मित्रमैत्रिणी सध्या काय करताहेत याचे अपडेटस् फेसबुक, इन्स्टाग्रामवर मिळतात. इन्स्टंट बातम्या देणारे ट्विटर, व्हॉटस्ऍपही दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. पण आता ते ‘आधार’च्या चौकटीत अडकले जाणार आहे. म्हणजेच आधार क्रमांकाशी लिंक केले जाणार आहे. त्यामुळे अफवा पसरवणारे, खोटय़ा बातम्या देणारे अचूक पकडले जातीलच, पण प्रत्येकाच्या खासगी जीवनातील हालचालींवरही सरकारची बारीक नजर राहणार आहे.

बँक अकाऊंटप्रमाणे सोशल मीडियावरील अकाऊंटही आधारला लिंक करण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या लिंकिंगची मागणी तामीळनाडू सरकारने केली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे संदेश आणि खोटय़ा बातम्यांना लगाम लावला जाऊ शकेल असे तामीळनाडू सरकारचे म्हणणे आहे. अशा स्वरूपाच्या चार याचिका मद्रास, मुंबई आणि ओडिशा उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्या सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरीत कराव्यात अशी याचिका फेसबुक इंकने केली होती. त्यावर 13 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, गुगल, ट्विटर, यू टय़ूब आणि इतरांना दिले आहेत.

सोशल मीडियावरील प्रोफाइल्स या खासगी असतात. त्यात खासगी माहिती असते जी फक्त त्यावरील मित्रपरिवारालाच शेअर केली जाऊ शकते. सोशल मीडियाला आधार लिंक करणे म्हणजे खासगी आयुष्यात डोकावण्यासारखे आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरच व्यक्त होऊ लागल्या आहेत. पण त्याची दुसरी बाजू ही सकारात्मक असल्याचेही म्हटले जात आहे. देशात आणि परदेशातील भटकंतीवर मनसोक्त उधळला जाणारा पैसा, सहजगत्या होत असलेली वाहन खरेदी, ऑनलाइन न केला जाणारा इतर खर्च हा या आधार लिंकिंगमुळे चव्हाटय़ावर येऊ शकेल आणि मग तो नक्की कोणत्या स्वरूपातून मिळालेल्या पैशातून होतोय याचाही शोध सुरू होईल अशी चर्चा आहे.

फेक अकाऊंट उघडणे होणार कठीण

सोशल मीडिया आधारला लिंक झाला तर ‘फेक’ अकाऊंट उघडणाऱयांना चाप बसणार आहे. कारण आधार क्रमांकाशिवाय कुणालाही फेसबुकवर अकाऊंट उघडता येणार नाही. उघडण्याचा प्रयत्न केला तर सहज पकडला जाईल. याशिवाय यापूर्वी असलेल्या फेक अकाऊंटचाही शोध लागेल.