जालना लाठीमार प्रकरणात फडणवीस निर्दोष, मग आदेश कुणी दिले?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना येथील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमार प्रकरणी गृह मंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोष असल्याचा खुलासा पोलिसांकडून माहिती अधिकारात करण्यात आला आहे. त्यामुळे मग लाठीमाराचे आदेश कुणी दिले होते, असा सवाल केला जात आहे.

अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीमार झाला होता. पोलिसांनी आंदोलकांवर छर्रेही मारले होते. या घटनेत अनेक मराठा बांधव, भगिनी जखमी झाल्या होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या लाठीमाराचा आदेश दिला होता, असा आरोप होता.

माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी माहितीच्या अधिकारात यासंदर्भात माहिती मागितली होती. जालन्याचे पोलीस उपअधीक्षक आर.सी. शेख यांनी डोंगरे यांच्या अर्जावर माहिती दिली आहे. त्यात गृह मंत्री फडणवीस यांच्याकडून लाठीमाराचे आदेश मिळाले नव्हते, असे शेख यांनी नमूद केले आहे. मात्र आदेश नक्की कुणी दिले होते याबद्दल शेख यांनी माहिती दिलेली नाही.